
सोलापूर, 11 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे, हैदराबाद आणि तुळजापूरकडे जाणारी वाहने तसेच स्थानिक वाहतूक एकाच मार्गावरून होत असल्याने सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील काही ठिकाणी वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी आता जुना पूना नाका ते बाळे परिसरात चार नवीन पूल उभारण्यात येत असून, त्यापैकी तीन पूल ऑगस्टअखेर वाहतुकीसाठी खुले होणार आहेत.
नवीन पूल आणि पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यानंतर स्थानिक वाहतूक महामार्गापासून वेगळी होणार आहे. त्यामुळे मुख्य महामार्गावरील वाहतुकीचा वेग आणि सुरळीतपणा वाढण्यास मदत होणार असून, अपघातांचा धोका कमी होण्याची अपेक्षा आहे. नवीन महामार्गाची उभारणी करताना जुना पूना नाका येथील एका बाजूचा पूल कायम ठेवण्यात आला. मात्र, मडकी वस्ती, बाळे आणि परिसरातील स्थानिक वाहतुकीसाठी स्वतंत्र पर्यायी पूल अथवा सर्व्हिस रोडची पुरेशी सुविधा उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळे स्थानिक नागरिकांना छोट्या अंतराच्या प्रवासासाठीही महामार्गावर यावे लागत होते.
स्थानिक वाहने आणि लांब पल्ल्याची वाहने एकाच मार्गावर आल्याने महामार्गावरील वाहतुकीत अडथळे निर्माण होत होते. त्याचबरोबर अपघातांची शक्यताही वाढली होती. ही समस्या लक्षात घेऊन चार नवीन पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
यामध्ये जुना पूना नाका येथील सांडपाण्याच्या ओढ्यावर दोन पूल, तर बाळेजवळील आदिला नदीवर दोन्ही बाजूंना दोन पूल, असे एकूण चार पूल उभारण्यात येत आहेत. या कामाची निविदा १६ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या चार पुलांच्या उभारणीसाठी सुमारे ५१ कोटी ५७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तीन पूल ऑगस्टअखेर वाहतुकीसाठी खुले झाल्यानंतर स्थानिक वाहतुकीला पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असून, सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड