सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात १३ ऑगस्टपासून विविध धार्मिक कार्यक्रम
सोलापूर, 11 ऑगस्ट (हिं.स.) : श्रावणाच्या पहिल्या सरी बरसताच शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सोलापूर नगरीत धार्मिक आणि सांस्कृतिक चैतन्य निर्माण झाले आहे. गुरुवार, १३ ऑगस्टपासून शहरात श्रावणमासातील भक्तीचा महाकुंभ सुरू होणार अस
Siddeswar


सोलापूर, 11 ऑगस्ट (हिं.स.) : श्रावणाच्या पहिल्या सरी बरसताच शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सोलापूर नगरीत धार्मिक आणि सांस्कृतिक चैतन्य निर्माण झाले आहे. गुरुवार, १३ ऑगस्टपासून शहरात श्रावणमासातील भक्तीचा महाकुंभ सुरू होणार असून, सिद्धेश्वर मंदिरासह शहराच्या पूर्व भागात भक्ती, श्रद्धा आणि भाषिक-सांस्कृतिक एकतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.

श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील तलावामुळे या भागाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रावण महिन्यात सिद्धेश्वर मंदिर हे संपूर्ण शहराचे धार्मिक ऊर्जाकेंद्र ठरते. यंदा श्रावणातील चारही सोमवारी मंदिरातील योगसमाधीवर आकर्षक फुलांची मेघडंबरी आरास करण्यात येणार आहे.

मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात दररोज पहाटे ५ वाजता काकड आरतीने होणार आहे. त्यानंतर सकाळी ७.३० वाजता रुद्राभिषेक, ८.३० वाजता सामूहिक महामंत्र, तर रात्री ९ वाजता प्रदक्षिणा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारून जाणार आहे.

श्रावणमासाच्या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांसाठी पूजासाहित्य विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले असून, आवश्यक प्राथमिक सोयी-सुविधांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, बहुभाषिक आणि विविध समाजघटकांच्या सण-उत्सवांनी समृद्ध असलेल्या सोलापूरच्या पूर्व भागातही श्रावणमासानिमित्त धार्मिक उत्सवांची मोठी पर्वणी असणार आहे. १७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत विविध समाजांचे पारंपरिक रथोत्सव दिमाखात पार पडणार आहेत.

यामध्ये तेलुगू, कन्नड, पद्मशाली, स्वकुलसाळी, तोगटवीर, नाभिक आणि परीट या सात समाजांच्या रथोत्सवांचा समावेश आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे सोलापूरच्या पूर्व भागात धार्मिक विधी, पारंपरिक मिरवणुका आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.

श्रावणातील धार्मिक परंपरा आणि विविध समाजांच्या उत्सवांमुळे सोलापूरच्या सामाजिक व सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडणार असून, शहरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण होणार आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande