देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह झाला बंद; सेन्सेक्स ३८८ अंकांनी घसरला
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट (हिं.स.)। निफ्टीच्या साप्ताहिक एक्सपायरीच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात आज घसरण नोंदवण्यात आली. व्यवहाराची सुरुवातही किरकोळ घसरणीसह झाली होती. बाजार उघडल्यानंतर पहिल्या सत्रात बहुतांश वेळ विक्रीचा दबाव कायम राहिल्याने सेन्से
Stock Market Closing


नवी दिल्ली, 11 ऑगस्ट (हिं.स.)। निफ्टीच्या साप्ताहिक एक्सपायरीच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात आज घसरण नोंदवण्यात आली. व्यवहाराची सुरुवातही किरकोळ घसरणीसह झाली होती. बाजार उघडल्यानंतर पहिल्या सत्रात बहुतांश वेळ विक्रीचा दबाव कायम राहिल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण वाढली. मात्र, दुसऱ्या सत्रात खरेदीदारांनी जोरदार खरेदी केल्याने बाजाराने काही प्रमाणात सावरत दिवसाचा व्यवहार पूर्ण केला. अखेर सेन्सेक्स ३८८.१९ अंक म्हणजेच ०.४९ टक्क्यांनी घसरून ७८ हजार १५४.२५ अंकांवर, तर निफ्टी ११२.१० अंक म्हणजेच ०.४६ टक्क्यांच्या घसरणीसह २४ हजार ४७१.७० अंकांवर बंद झाला.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३२.६७ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७८ हजार ५०९.७७ अंकांवर उघडला. सुरुवातीपासूनच विक्रीचा दबाव वाढल्याने सेन्सेक्स दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ४९४.१८ अंकांनी घसरून ७८ हजार ४८.२६ अंकांच्या दिवसातील नीचांकी पातळीवर पोहोचला. त्यानंतर खरेदीला सुरुवात झाल्याने निर्देशांकाने काही प्रमाणात सुधारणा केली आणि अखेर ३८८.१९ अंकांच्या घसरणीसह तो बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८.७० अंकांनी घसरून २४ हजार ५७५.१० अंकांवर उघडला. पहिल्या सत्रात झालेल्या जोरदार विक्रीमुळे निफ्टी १५४.५५ अंकांनी घसरून २४ हजार ४२९.२५ अंकांपर्यंत खाली आला. त्यानंतर झालेल्या खरेदीमुळे त्याने काही प्रमाणात सावरत २४ हजार ४७१.७० अंकांवर व्यवहाराचा शेवट केला.

आज औषधनिर्माण आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदीचा कल दिसून आला. तेल आणि वायू निर्देशांकही किरकोळ वाढीसह बंद झाला. मात्र, एफएमसीजी, धातू आणि वाहन क्षेत्रातील समभागांवर विक्रीचा दबाव राहिला. बँकिंग, भांडवली वस्तू, ग्राहक टिकाऊ वस्तू आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्देशांकातही घसरण झाली. व्यापक बाजारात संमिश्र वातावरण राहिले. मिडकॅप निर्देशांक ०.०२ टक्क्यांनी घसरला, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.२२ टक्क्यांनी वाढला.

बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे २.५३ लाख कोटी रुपयांची घट झाली. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य सोमवारी ४९५.३१ लाख कोटी रुपये होते. ते आज घटून ४९२.७८ लाख कोटी रुपयांवर आले. त्यामुळे गुंतवणूकदारांना एका दिवसात मोठा आर्थिक फटका बसला. आजच्या व्यवहारात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, एटरनल, टीसीएस, टायटन आणि इन्फोसिस हे प्रमुख वाढीव समभाग ठरले. दुसरीकडे टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, मॅक्स हेल्थकेअर, नेस्ले, अल्ट्राटेक सिमेंट आणि अपोलो हॉस्पिटल्स यांच्या समभागांमध्ये सर्वाधिक घसरण झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande