अमरावती जिल्ह्यात २० हजारांहून अधिक अँटी-स्नेक व्हेनमच्या व्हायल्स उपलब्ध
अमरावती, ११ ऑगस्ट (हिं.स.) : पावसाळ्यात साप बिळाबाहेर येत असल्याने सर्पदंशाच्या घटनांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात सर्पदंशावरील उपचारासाठी अँटी-स्नेक व्हेनमच्या २० हजारांहून अधिक व्हायल्सचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती
जिल्ह्यात अँटी-स्नेक व्हेनमचा २० हजारांवर साठा सर्पदंश झाल्यास रुग्णालयात जाण्याचे आवाहन


अमरावती, ११ ऑगस्ट (हिं.स.) : पावसाळ्यात साप बिळाबाहेर येत असल्याने सर्पदंशाच्या घटनांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात सर्पदंशावरील उपचारासाठी अँटी-स्नेक व्हेनमच्या २० हजारांहून अधिक व्हायल्सचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सर्पदंश झाल्यास अंधश्रद्धेला बळी न पडता तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याचे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशावरील उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर कोणताही विलंब न करता रुग्णाला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे.

सर्पदंशानंतर झाडफूक, गंडेदोरे, मांत्रिक किंवा अन्य अंधश्रद्धाळू उपचारांवर विश्वास ठेवल्यास वैद्यकीय उपचारास विलंब होऊन रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे अफवा आणि अंधश्रद्धेला बळी न पडता केवळ वैद्यकीय उपचारांवर विश्वास ठेवावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

सर्पदंश टाळण्यासाठी खबरदारी आवश्यक

पावसाळ्यात शेतात काम करताना गमबूट किंवा मजबूत पादत्राणांचा वापर करावा. रात्री घराबाहेर पडताना टॉर्चचा वापर करावा. घर व परिसर स्वच्छ ठेवणे, गवताचे ढिगारे व अडगळ साचू न देणे, अशी खबरदारी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. परिसरात साप आढळल्यास त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न न करता संबंधित यंत्रणेला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सध्या सर्पदंशावरील औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता सर्पदंश झाल्यास वेळेत वैद्यकीय उपचार घ्यावेत. योग्य वेळी उपचार मिळाल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

नागरिकांनी पावसाळ्यात सतर्क राहावे

पावसाळ्यात साप बिळाबाहेर येत असल्याने सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी. सर्पदंश झाल्यास अंधश्रद्धेला बळी न पडता तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांनी केले आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande