
इगतपुरी, 11 ऑगस्ट (हिं.स.) शासनाने घोषणा करूनही विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले असून गणवेशाविनाच स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागणार आहे. शासनाने घोषित केलेल्या घोषणेनुसार शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश आणि पुस्तके देण्यात येणार होती परंतु त्यानंतर अडीच महिन्याने आलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देखील विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहण्याची घटना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री असलेल्या जिल्ह्यामध्येच समोर आली आहे.
नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या तीव्र अनास्था आणि गलथान कारभारामुळे इगतपुरीसह ग्रामीण भागातील शाळा व्यवस्थापन समित्या मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. यंदा १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापूर्वी विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळणे तर दूरच, पण पहिल्या गणवेशाचे पैसेही अद्याप शाळांना प्राप्त झालेले नाहीत. परिणामी, यंदा विद्यार्थ्यांना जुन्याच कपड्यांवर स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची नामुष्की ओढवली आहे. आज ११ ऑगस्ट असून अवघे काही दिवस स्वातंत्र्य दिनाला उरले आहेत. सामान्यतः शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर १५ जूनच्या आसपास पहिला गणवेश दिला जातो. दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी मुले दुसरा गणवेश घालून अत्यंत उत्साहात नवीन कपड्यांमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होतात. मात्र, यंदाचा प्रकार अत्यंत निराळा आणि संतापजनक आहे. शाळांना १५ जूनला वितरित करण्यात आलेल्या पहिल्या गणवेशाचे शासकीय अनुदान अद्याप शाळा व्यवस्थापन समित्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले नाही. यामुळे स्थानिक पुरवठादारांनी (सप्लायर्स) पहिल्याच बिलासाठी शाळांवर तगादा लावला आहे. पैसे न मिळाल्यामुळे पुरवठादारांना तोंड देणे शाळांना कठीण झाले असून दुसरीकडे दुसरा गणवेश मिळण्याची शक्यता मावळली आहे. योजना जाहीर होतात, मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे त्या वेळेवर पूर्ण होत नाहीत, असा अनुभव पुन्हा एकदा आला आहे. स्वातंत्र्य दिनासारख्या राष्ट्रीय सणाला नवीन गणवेशात जाण्याची लहान मुलांची उत्सुकता असते, मात्र शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे या उत्साहावर पाणी फेरले गेले आहे.
गोरगरिबांच्या मुलांना वेळेवर गणवेश मिळण्यापासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. या गंभीर प्रकारामुळे जिल्हा परिषद प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, तातडीने निधी वितरीत करून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
-----------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI