
मुंबई, 11 ऑगस्ट (हिं.स.)। : साहसी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयामार्फत तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार (आयएनएनएए) २०२५ प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी साहसी खेळाडू आणि साहसी उपक्रम करणाऱ्या व्यक्तींनी अर्ज २० ऑगस्ट पर्यंत awards.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे.
या पुरस्कारांतर्गत सामान्यतः जमीन, समुद्र आणि हवाई साहसी उपक्रमांसाठी प्रत्येकी एक पुरस्कार, तसेच साहसी क्षेत्रातील ‘आजीवन योगदान’ या श्रेणीसाठी स्वतंत्र पुरस्कार प्रदान केला जातो.
सन २०२५ च्या पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या खेळाडूंची कामगिरी २०२३, २०२४ आणि २०२५ या मागील तीन वर्षांतील असणे आवश्यक आहे. संबंधित साहसी उपक्रम हे जमीन, पाणी किंवा हवाई क्षेत्रातील असावेत. तसेच नामांकन करणाऱ्या खेळाडूची कामगिरी अतिउत्कृष्ट असणे आवश्यक आहे. ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
मुंबई शहरासह राज्यातील साहसी उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साहसी खेळाडूंनी या राष्ट्रीय पुरस्कारासाठी मोठ्या संख्येने अर्ज सादर करावे, असे आवाहनही जिल्हा क्रीडा अधिकारी अडसूळ यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर