लातूरमध्ये मुदतबाह्य पाण्याच्या बाटल्या रस्त्यावर फेकून चालक पसार
लातूर, 11 ऑगस्ट (हिं.स.)। पाणी विक्रीतील नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई होण्याची धास्ती निर्माण झाली असतानाच लातूर शहरात मुदतबाह्य पाण्याच्या बाटल्या थेट रस्त्यावर फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूर रिंग रोडवरील मळवटी परिसरात हा
पाण्याच्या बाटल्या टाकून पसार


लातूर, 11 ऑगस्ट (हिं.स.)। पाणी विक्रीतील नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई होण्याची धास्ती निर्माण झाली असतानाच लातूर शहरात मुदतबाह्य पाण्याच्या बाटल्या थेट रस्त्यावर फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूर रिंग रोडवरील मळवटी परिसरात हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका टमटममधून मोठ्या प्रमाणात पाण्याच्या बाटल्या आणण्यात आल्या. या बाटल्या मुदतबाह्य असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या योग्य पद्धतीने नष्ट करण्याऐवजी टमटममधून रस्त्याच्या कडेला टाकण्यात आल्या. संपूर्ण बाटल्या रस्त्यावर फेकल्यानंतर संबंधित टमटम चालक तेथून पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, मुदतबाह्य पाण्याच्या बाटल्या ग्राहकांना विकल्या जात होत्या का? त्या बाटल्या रस्त्यावर फेकण्याची वेळ का आली? तसेच या प्रकारामागे नेमका कोणता व्यवसायिक आहे, याचा तपास करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, पाण्याच्या गुणवत्तेबाबत राज्यात कडक कारवाईची चर्चा सुरू असल्याने संबंधित व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे का, असा सवालही उपस्थित होत आहे. मात्र, मुदतबाह्य पाण्याच्या बाटल्या उघड्यावर फेकून देणे हा समस्येवरील उपाय नसून, त्यांची नियमानुसार विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. रिंग रोड आणि मळवटी परिसरात अशा प्रकारे मुदतबाह्य पाण्याचा साठा फेकला जात असेल, तर संबंधित अन्न सुरक्षा विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून बाटल्यांची तपासणी करावी. तसेच या बाटल्या कोणत्या विक्रेत्या किंवा उत्पादकाच्या आहेत, त्याचा शोध घेऊन नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande