सिल्लोड एसटी कॅन्टीनवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन आढळले परवाना निलंबित करून कॅन्टीन बंद छत्रपती संभाजीनगर, 11 ऑगस्ट (हिं.स.) : सिल्लोड येथील एसटी बसस्थानकातील कॅन्टीनची अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तपासणी केली. या तपासणीत कॅन्टीनमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आ
सिल्लोड एसटी कॅन्टीनवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई


अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन आढळले

परवाना निलंबित करून कॅन्टीन बंद

छत्रपती संभाजीनगर, 11 ऑगस्ट (हिं.स.) : सिल्लोड येथील एसटी बसस्थानकातील कॅन्टीनची अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तपासणी केली. या तपासणीत कॅन्टीनमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आले. त्यामुळे प्रशासनाने कॅन्टीनचा परवाना तत्काळ निलंबित करून कॅन्टीन बंद करण्याची कारवाई केली.

तपासणीदरम्यान कॅन्टीनचा परिसर अत्यंत अस्वच्छ असल्याचे आढळले. फरशी व भिंती घाणेरड्या होत्या, तर खिडक्यांना जाळ्या लावण्यात आलेल्या नव्हत्या. कॅन्टीनमध्ये एफएसएसएआय परवाना फलक लावलेला नव्हता. तसेच पाण्याच्या तपासणीचा अहवालही उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.

भांडी धुण्याची जागा अस्वच्छ असल्याचेही आढळले. खाद्यपदार्थांच्या खरेदी-विक्रीसंबंधी नोंदी अपूर्ण होत्या. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रे उपलब्ध नव्हती. कर्मचाऱ्यांकडे ॲप्रन आणि हातमोजे नसल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले.

याशिवाय कॅन्टीनमध्ये नियमित साफसफाई तसेच कीटक नियंत्रणाबाबतच्या नोंदी आढळल्या नाहीत. उघड्या कचराकुंड्या आणि सदोष सांडपाणी व्यवस्थेमुळेही स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

या सर्व गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करत कॅन्टीनचा परवाना निलंबित केला आणि कॅन्टीन बंद केले. एसटी बसस्थानकातील कॅन्टीनमध्ये आढळलेल्या या गंभीर अनियमिततेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande