गर्भवती महिला व बाळाच्या मृत्यूप्रकरणी चौघे निलंबित
परभणी जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयातील प्रकरण दोन डॉक्टरांसह दोन रुग्णवाहिका चालकांवर कारवाई परभणी, ११ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयात वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने गर्भवती महिला आणि तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू
गर्भवती महिला व बाळाच्या मृत्यूप्रकरणी चौघे निलंबित


परभणी जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयातील प्रकरण

दोन डॉक्टरांसह दोन रुग्णवाहिका चालकांवर कारवाई

परभणी, ११ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयात वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने गर्भवती महिला आणि तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आरोग्य विभागाने कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १०८ रुग्णवाहिकेच्या दोन चालकांना निलंबित करण्यात आले आहे.

या घटनेनंतर आरोग्य विभागाने प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक दयानंद मोतीफळे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय विशेष समिती गठित करण्यात आली. समितीने जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले.

चौकशीदरम्यान रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास झालेला विलंब आणि संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून झालेला कथित निष्काळजीपणा या प्रकरणात कारणीभूत असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आरोग्य विभागाने संबंधितांवर निलंबनाची कारवाई केली.

या कारवाईत डॉ. कुलदीप चोरमले आणि डॉ. अभिजित इप्पर या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १०८ रुग्णवाहिकेचे चालक मोहम्मद जलाल आणि केशव यादव यांना निलंबित करण्यात आले आहे.

गंभीर स्वरूपाच्या या घटनेमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि रुग्णवाहिका व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चौकशीत समोर आलेल्या निष्कर्षांच्या आधारे संबंधितांवर कारवाई करण्यात आल्याने या प्रकरणाकडे आरोग्य विभागाने गांभीर्याने पाहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande