
नवी दिल्ली/न्यूयॉर्क, 11 ऑगस्ट (हिं.स.)। अमेरिकेतील एका न्यायालयाने अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्याविरुद्ध प्रतिभूती आणि फसवणुकीशी संबंधित फौजदारी खटला कायमस्वरूपी फेटाळून लावला आहे. यासोबतच कथित फसवणूक आणि लाचखोरीच्या प्रकरणात गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेली कायदेशीर कार्यवाही आता संपली आहे.
न्यूयॉर्कच्या ‘यूएस डिस्ट्रिक्ट कोर्ट फॉर द ईस्टर्न डिस्ट्रिक्ट’ने न्याय विभागाच्या नियम 48(ए) अंतर्गत दाखल केलेली याचिका स्वीकारत आरोपपत्रातील दुसरा, तिसरा आणि चौथा आरोप फेटाळून लावला. न्यायाधीश निकोलस गैरॉफिस यांनी अभियोजन पक्षाकडून प्रकरण मागे घेण्याच्या निर्णयाबाबत अतिरिक्त स्पष्टीकरण मागितल्यानंतर न्याय विभागाची याचिका मंजूर केली आहे. आरोप कायमस्वरूपी फेटाळले जाण्याचा अर्थ असा आहे की फौजदारी कार्यवाही कायमची संपली आहे आणि हे आरोप पुन्हा दाखल करता येणार नाहीत. या आरोपांमध्ये प्रतिभूती फसवणुकीचा कट, वायर फसवणुकीचा कट आणि प्रतिभूती फसवणुकीचे आरोप समाविष्ट होते.
गौतम अदाणी यांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले की, त्यांनी हा निर्णय नम्रतेने आणि न्यायालयीन प्रक्रियेबद्दलच्या मनापासूनच्या आदराने स्वीकारला आहे. अदाणी यांनी ‘एक्स’वर जारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, ‘‘या आव्हानात्मक काळात सत्य, निष्पक्षता आणि कायद्याच्या राज्यावरील आमचा विश्वास कधीही डळमळला नाही.
त्यांनी म्हटले की, माझ्यावर, व्यवस्थेवर आणि भारताच्या न्यायव्यवस्थेच्या क्षमतेवर विश्वास कायम ठेवणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे. आम्ही आपल्या देशाच्या उभारणीसाठी, दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्यासाठी आणि स्वतःपेक्षा मोठ्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी काम करत राहू हीच आमची बांधिलकी आहे.’’
हे फौजदारी प्रकरण नोव्हेंबर 2024 मध्ये सुरू झाले होते, जेव्हा अमेरिकन अभियोजकांनी आरोप केला होता की गौतम अदाणी, सागर अदाणी, अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड (एजीईएल)चे माजी सीईओ वनीत जैन आणि इतर लोक भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना 25 कोटी अमेरिकन डॉलरची लाच देण्याच्या कटात सहभागी होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule