
यवतमाळ, 11 ऑगस्ट (हिं.स.) | यवतमाळ जिल्ह्याभरातील तस्करांनी ठिकठिकाणी बेहिशोबी वाळूसाठे निर्माण केले आहे. आता त्या साठ्यातील वाळू सर्वसामान्यांना बेभावपणे विक्री केल्या जात आहे. या प्रकारामुळे खनिकर्म तसेच तहसील विभागाने पूर्णता दुर्लक्ष केले. परिणामी, तस्करांचे चांगलेच फावते झाले आहे. जिल्ह्यातील यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, वणी, मारेगाव, झरी, केळापूर, घाटंजी, आर्णी, महागाव, उमरखेड, दिग्रस, दारव्हा, नेर, आदी तालुक्यात वाळू उपसा मोठ्या प्रमाणात झाला आहे.
अपेक्षेत महसुल खनिकर्म विभागाला मिळाला. परंतु वाळू उपसा त्या तुलनेत मोठ्या प्रमाणात झाला आहे. पावसाळ्यापूर्वी वाळू साठे करण्याकडे तस्करांचा कल दिसून आला होता. जवळपास सर्वच तालुक्यात वाळू तस्कर सक्रिय झाले होते. या तस्करांनी नदी पात्रातून मंजूरीपेक्षा जास्त वाळूचा उपसा करून ठेवला आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात तसेच खुल्या प्लॉटवर वाळूची साठवणूक करून ठेवण्यात आली आहे. काही प्लॉटधारकाला वाळू कुणाची आहे याची सुद्धा कल्पना नाही. तर जिल्ह्यातील काही तालुक्याच्या जंगल भागातही वाळूचे साठे निर्माण केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. अशा वाळू साठ्याच्या तक्रारी खनिकर्म तसेच संबंधित तहसील प्रशासनाकडे करण्यात आलेल्या आहेत.
या तक्रारींच्या अनुषंगाने प्रशासनाने कडक कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु तक्रारींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. आता साठवणूक करून ठेवण्यात आलेली वाळू खुलेआम पद्धतीने सर्वसामान्यांना आव्वाच्या सव्वा दरात विक्री केल्या जात आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. बऱ्याच वाळू साठ्यावर प्रत्यक्ष महसूलच्या पथकाने भेटी देऊन साठ्याची पाहणी केली. परंतु अशा वाळू साठ्यावर कारवाई करण्यास कुणीही समोर आले नाही. एकंदरीत खनिकर्म, तहसील तसेच पोलिसांनी केलेल्या दुर्लक्षामुळे वाळू तस्करांचे चांगलेच फावते होत असल्याचे दिसून येत आहे. याकरिता जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ‘टास्क फोर्स’ची निर्मिती करून कारवाईचे सत्र राबविणे गरजेचे बनले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी