महिला बांधकाम कामगारांना प्रसूतीसाठी २५ हजारांचे अर्थसहाय्य
नैसर्गिक आणि सिझेरियन प्रसूतीसाठी समान मदत प्रसूतीनंतर वर्षभरात अर्ज आवश्यक सोलापूर, 11 ऑगस्ट (हिं.स.) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदणीकृत महिला बांधकाम कामगारांसाठी प्रसूती साहाय्य योजना पुन्हा सुरू करण्
महिला बांधकाम कामगारांना प्रसूतीसाठी २५ हजारांचे अर्थसहाय्य


नैसर्गिक आणि सिझेरियन प्रसूतीसाठी समान मदत

प्रसूतीनंतर वर्षभरात अर्ज आवश्यक

सोलापूर, 11 ऑगस्ट (हिं.स.) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदणीकृत महिला बांधकाम कामगारांसाठी प्रसूती साहाय्य योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिला बांधकाम कामगारांना नैसर्गिक अथवा सिझेरियन प्रसूतीसाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रसूतीनंतर एका वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.

नैसर्गिक आणि सिझेरियन प्रसूतीसाठी समान आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने महिला बांधकाम कामगारांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. प्रसूतीनंतर काही काळ महिलांना काम करणे शक्य होत नसल्याने त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे.

आई आणि नवजात बालकाच्या आरोग्याची योग्य काळजी घेता यावी, माता व बालकांचे पोषण सुधारावे तसेच कुपोषण टाळता यावे, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे. प्रसूतीनंतर महिलेला आवश्यक आर्थिक आधार उपलब्ध करून देणे, हाही योजनेचा महत्त्वाचा हेतू आहे.

या संदर्भात उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिला बांधकाम कामगारांना या आर्थिक मदतीचा लाभ घेता येणार आहे.

प्रसूतीनंतर एका वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक असल्याने पात्र महिला बांधकाम कामगारांनी विहित मुदतीत अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande