यवतमाळमध्ये रायगडच्या धर्तीवर शिवरायांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा उभारणार
यवतमाळ 11 ऑगस्ट (हिं.स.) | शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणार्या शिवतीर्थाचा आता रायगडच्या धर्तीवर कायापालट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवतीर्थ परिसराच्या विकासासाठी तब्बल ५० ते ७५ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात येत अस
रायगडाच्या धर्तीवर उजळणार यवतमाळचे शिवतीर्थ!


यवतमाळ 11 ऑगस्ट (हिं.स.) | शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणार्या शिवतीर्थाचा आता रायगडच्या धर्तीवर कायापालट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवतीर्थ परिसराच्या विकासासाठी तब्बल ५० ते ७५ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात येत असून, तो मंजुरीसाठी नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. या आराखड्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरील पुतळ्याच्या धर्तीवर सिंहासनाधिष्ठित भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा शिवतीर्थावर उभारण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले होते. या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नगरविकास विभागामार्फत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री संजय राठोड यांना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महसूल भवन येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी विकास मीना, यवतमाळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार तसेच मराठा सेवा संघाचे सुनील कडू, नंदू बुटे, ज्ञानेश्वर गायकवाड उपस्थित होते. बैठकीत शिवतीर्थाच्या प्रस्तावित विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शिवतीर्थ बनेल नवे पर्यटनस्थळ

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर यवतमाळचे शिवतीर्थ केवळ स्मारक न राहता प्रमुख पर्यटन, सांस्कृतिक आणि प्रेरणास्थळ म्हणून विकसित होण्याची अपेक्षा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्य आणि विचारांची प्रेरणा देणारे भव्य स्मारक उभारल्यास पर्यटनाला नवी ओळख मिळण्यास मदत होणार आहे.

असा असेल विकास आराखडा

प्रस्तावित आराखड्यात शिवतीर्थ परिसराचे आकर्षक सुशोभिकरण, भव्य प्रवेशद्वार, आधुनिक प्रकाशयोजना, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा, विकसित उद्यान तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावर विराजमान असलेला भव्य पुतळा उभारण्याचा समावेश आहे. परिसरात आधुनिक पर्यटन सुविधा यांचा सुरेख मेळ साधण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ५० ते ७५ कोटी रुपयांचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. निधी आणि प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष विकासकामांना गती मिळण्याची शक्यता आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande