अमरावतीत शिक्षक सहकारी बँकेच्या आमसभेत १२ विषयांवर खल
अमरावती, ११ ऑगस्ट (हिं.स.) : अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, १६ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता अंशुमन पॅलेस, श्रीनिवास कॉलनी, कठोरा चौक जकात नाका-रहाटगाव रिंग रोड, अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे. बँकेच्या
जि.प. शिक्षक बँकेची आमसभा 16 ऑगस्टला:12 विषयांवर चर्चा, वादाची शक्यता


अमरावती, ११ ऑगस्ट (हिं.स.) : अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, १६ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता अंशुमन पॅलेस, श्रीनिवास कॉलनी, कठोरा चौक जकात नाका-रहाटगाव रिंग रोड, अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे. बँकेच्या आर्थिक आणि प्रशासकीय कामकाजाशी संबंधित १२ महत्त्वपूर्ण विषयांवर या सभेत चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत.

सभेत सन २०२४-२५ च्या वार्षिक अहवालास तसेच सन २०२५-२६ च्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्याचा विषय मांडण्यात येणार आहे. यासोबतच लेखापरीक्षकांच्या अहवालावर चर्चा करून तो स्वीकारणे आणि मागील वर्षाच्या लेखापरीक्षणातील दोष दुरुस्ती अहवालावर विचार करून त्यास स्वीकृती देणे, या विषयांचाही अजेंड्यात समावेश आहे.

तसेच सन २०२६-२७ करिता वैधानिक लेखापरीक्षकांची नियुक्ती व त्यांचे मानधन निश्चित करणे, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदींनुसार बँकेच्या कामकाजाचा आढावा घेणे आणि सभासदांच्या प्रशिक्षणाबाबत विचारविनिमय करणे, या विषयांवरही सभेत चर्चा होणार आहे.

दरम्यान, बँकेच्या कर्जावरील व्याजदर, लाभांश, महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना सभासदत्व बहाल करणे, मुख्यालय इमारतीचे बांधकाम, बुलढाणा शाखा सुरू करणे, संचालक मंडळाची संख्या वाढविणे तसेच उच्च शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून देणे, अशा महत्त्वपूर्ण विषयांवरही सभेत चर्चा होऊन ठराव मंजूर केले जाणार आहेत.

दोन मुद्द्यांवर वादाची शक्यता

मुख्यालय इमारतीच्या बांधकामाचा विषय तसेच महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना बँकेचे सभासदत्व देण्याचा प्रस्ताव यावरून सभेत वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या दोन्ही विषयांवरील चर्चेकडे विशेष लक्ष लागले आहे.

सध्याच्या संचालक मंडळाची ही शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बँकेच्या आगामी वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या निर्णयांमुळे सभेकडे बँकेच्या सभासदांसह सहकारी क्षेत्रातील विविध घटकांचे लक्ष लागले आहे.

संचालक मंडळाने सर्व सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande