रत्नागिरी : शालेय विद्यार्थ्यांच्या एसटी प्रवासातील गैरसोयींबाबत भाजपचे एसटीला निवेदन
रत्नागिरी, 11 ऑगस्ट (हिं.स.) । रत्नागिरी शहरातून आजूबाजूच्या ग्रामीण भागात शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना एसटी बससेवेमुळे होणाऱ्या विविध गैरसोयींची दखल घेत भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडळातर्फे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक
एसटी विभाग नियंत्रकांना भाजपचे निवेदन


रत्नागिरी, 11 ऑगस्ट (हिं.स.) । रत्नागिरी शहरातून आजूबाजूच्या ग्रामीण भागात शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना एसटी बससेवेमुळे होणाऱ्या विविध गैरसोयींची दखल घेत भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडळातर्फे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक जानराव यांना निवेदन देण्यात आले.

भाजपा शहराध्यक्ष परशुराम (दादा) ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने विभाग नियंत्रकांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली. शहरातील अनेक शाळा सायंकाळी ५.३० वाजता सुटतात, मात्र आजूबाजूच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक एसटी बसेस त्यापूर्वीच साधारण ५च्या सुमारास निघून जातात. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील बसची वाट पाहत थांबावे लागते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची मोठी गैरसोय होते. बस रिकामी असतानाही काही ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी बस थांबवली जात नाही. बसमध्ये चढताना-उतरताना पुरेसा वेळ दिला जात नाही. काही वेळा या बसमध्ये पास चालत नाही, असे सांगून विद्यार्थ्यांना त्रास दिला जातो, अशा तक्रारी मांडण्यात आल्या. परीक्षा कालावधीतही विद्यार्थ्यांना आवश्यक ते सहकार्य मिळत नसल्याचा मुद्दा शिष्टमंडळाने विभाग नियंत्रकांच्या निदर्शनास आणून दिला. एसटी बसच्या चालक-वाहकांकडून विद्यार्थ्यांशी गैरवर्तन, अरेरावी किंवा नियमबाह्य पद्धतीने वागणूक दिली जात असल्यास त्याची तातडीने दखल घेण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

काही बसफेऱ्यांमध्ये कमी प्रवासी असतानाही बसेस धावत असल्याने महामंडळाचे आर्थिक नुकसान होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. विद्यार्थ्यांची संख्या आणि शाळांच्या वेळांचा योग्य मेळ घालून बससेवेचे नियोजन केल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होण्यासोबतच एसटी महामंडळालाही अधिक प्रवासी मिळू शकतात, असा मुद्दा भाजपा शिष्टमंडळाने मांडला.

यावर विभाग नियंत्रकांनी चालक अथवा वाहकांकडून विद्यार्थ्यांशी गैरवर्तन झाल्याची तक्रार आल्यास संबंधितांची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. विभाग नियंत्रकांनी शिष्टमंडळाचे म्हणणे सविस्तर ऐकून घेत विद्यार्थ्यांच्या समस्यांवर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले या. प्रश्नाचा पुढील पाठपुरावा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande