
मुंबई, 11 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात गेल्या रात्री सलग दोन भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जव्हार-विक्रमगड परिसरात आलेल्या दोन्ही भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2 आणि 3.4 इतकी मोजण्यात आली. मात्र, कमी तीव्रतेच्या या धक्क्यांमुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आणि भूकंपाच्या वेळी सुरक्षा उपायांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
पालघर जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आज सांगितले की, पहिला भूकंप गेल्या रात्री 10 वाजून 04 मिनिटांनी जाणवला, तर दुसरा धक्का रात्री सुमारे 11 वाजता आला. दोन्ही धक्क्यांची तीव्रता अनुक्रमे 3.2 आणि 3.4 इतकी होती. जिल्हा माहिती विभागाने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात जमिनीखाली सुमारे पाच किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगण्यात आले आहे. सलग दोन धक्के जाणवल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणत्याही मोठ्या नुकसानीची माहिती नाही. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
अधिकाऱ्यांनी नागरिकांना घाबरू नये आणि भूकंपाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी जाण्यासह आवश्यक सुरक्षा उपायांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पालघर महाराष्ट्राच्या किनारी भागात स्थित असून, जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. गेल्या महिन्यातही जिल्ह्याच्या विविध भागांत भूकंपाचे अनेक धक्के नोंदवण्यात आले होते. यापूर्वी 31 जुलै रोजी पालघर जिल्ह्यात 3.5 तीव्रतेचा भूकंप झाला होता. तसेच, 25 जुलै रोजी मुसळधार पावसादरम्यान डहाणू तहसीलमधील गंजाड परिसरात 3.1 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला होता. 28 जुलै रोजीही जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते, ज्याचा केंद्रबिंदू पाटीलपाडा गावात असल्याचे सांगण्यात आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule