
रत्नागिरी, 12 ऑगस्ट, (हिं.स.) । ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या संघटनेने राज्य पातळीवरील ११ पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर केले आहेत. या पुरस्कारांची घोषणा संघटनेचे केंद्रीय सचिव अतुल होनकळसे, प्रदेश सरचिटणीस गोविंदसिंग राजपूत, केंद्रीय अध्यक्ष यासिन पटेल, प्रदेशाध्यक्ष अॅड. विठ्ठल मोघे यांनी केली आहे.
ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल ही पत्रकार संघटना गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत आहे. पत्रकार पुरस्कारांबरोबरच सामाजिक क्षेत्रातही सामाजिक बांधिलकी म्हणून नेहमीच पुढाकार संस्था घेते. या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचा पुरस्कार वितरण सोहळा यंदा मुंबईत गांधी बुक सेंटर येथे २० ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता पार पडणार आहे.
या पुरस्कारात आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार नांदेड येथील दैनिक स्वतंत्र वार्ताचे कार्यकारी संपादक कालिदास अनंतोजी यांना जाहीर झाला तर संपादक नानासाहेब जोशी यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार चिपळूण येथील वरिष्ठ पत्रकार मकरंद भागवत यांना जाहीर झाला. पांडुरंग भटकर यांच्या नावाने जाहीर करण्यात आलेला पुरस्कार बुलढाणा चिखली येथील श्याम देशमुख यांना देण्यात येणार आहे.
अन्य पुरस्कार असे - हेमंत कुलकर्णी मराठी संपादक पुरस्कार परभणी पूर्णा येथील नागनाथ नागठाणे, मधुकर लोंढे स्मृती पुरस्कार युवराज धनवडे (दै. पुण्यनगरी, कोल्हापूर), नवीन सोष्टे स्मृती मराठी वार्ताहर पुरस्कार अकोला येथील बाळकृष्ण नेरकर, मधू रावकर शहर वार्ताहर पुरस्कार ठाणे येथील महादेव माने, जयानंद मठकर पुरस्कार पुणे येथील अमरसिंग परदेशी, शरद दादा बोरकर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार राजू रणवीर, दलितमित्र रमाकांत आर्ते पुरस्कार रायगड येथील सुभाष पाटील, राज्यस्तरीय दर्पण प्रेरणा पुरस्कार परभणी येथील मराठवाडा केसरीचे कार्यकारी संपादक सत्यजित गावंडे, जीवन गौरव पुरस्कार मालाड येथील निसार अली सय्यद आणि पनवेल येथील संजय कदम.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी