
यवतमाळ, 12 ऑगस्ट (हिं.स.)।
अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाटणबोरीत गणेशमूर्ती घडविण्याच्या कामाला वेग आला आहे. गावातील विविध मूर्तीकारांच्या मूर्ती बनविण्याच्या ठिकाणी सध्या विविध आकारांच्या, आकर्षक, सुबक आणि देखण्या गणेशमूर्ती साकारल्या जात असून गणरायाच्या आगमनाची उत्सुकता सर्वत्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे, पाटणबोरीतील गणेशमूर्तींना तेलंगणा आंध्र प्रदेशसह कर्नाटकातील बंगळुरूपर्यंत मागणी असून, यंदा बंगळुरूसाठीही गणेशमूर्ती रवाना होत आहेत. काही गणपती मूर्तीची किंमत तर एक ते दोन लाख रूपयांपर्यंत असल्याचे कळते. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ओळख असलेल्या पाटणबोरीतील गणेशमूर्तींना दरवर्षी मोठी मागणी असते. विशेषतः शेजारील तेलंगणा राज्यात सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असल्यामुळे तेथील अनेक गणेश मंडळे, भाविक पाटणबोरीतील मूर्तीकारांकडून गणेशमूर्ती खरेदी करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे येथून दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती तेलंगणातील विविध शहरांमध्ये आणि गावांमध्ये रवाना केल्या जातात. यंदा या मागणीचा विस्तार आणखी दूरपर्यंत झाला असून कर्नाटकातील बंगळुरू शहरातही पाटणबोरीत तयार झालेल्या गणेशमूर्ती पोहोचत आहेत. त्यामुळे पाटणबोरीतील मूर्तीकारांच्या कलेची मागणी महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या भागापुरती मर्यादित न राहता देशाच्या मोठ्या शहरापर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे. मातीला आकार देणे, मूर्ती सुकविणे, रंगकाम, कलाकुसर आणि अंतिम सजावट अशी सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून मूर्ती बनविण्याच्या ठिकाणी सध्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
स्थानिकांना रोजगार पारंपरिक गणेशमूर्तींसह आधुनिक संकल्पना, आकर्षक सिंहासने, विविध रंगसंगती आणि कलात्मक शैलीतील मूर्तीही तयार करण्यात येत आहेत. गणेशमूर्ती निर्मितीमुळे स्थानिक कारागिरांसह रंगकाम करणारे कलाकार, सजावटीचे साहित्य विक्रेते, वाहतूक व्यवसाय आणि इतर पूरक व्यवसायांनाही रोजगार उपलब्ध होत आहे.
--------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी