
बंगळूरू , 12 ऑगस्ट (हिं.स.)बलात्कार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर बंगळूरू तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले जनता दल (सेक्युलर) पक्षाचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याकडे एक मोबाईल फोन सापडला आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अचानक टाकलेल्या छाप्यात ते फोन वापरत असताना आढळले.
गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला असून, रेवण्णा यांना तुरुंगात फोन कसा मिळाला याचा तपास सुरू आहे. कारवाई करत, अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणाबद्दल एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याला निलंबित केले आहे आणि प्रज्वल रेवण्णा यांच्या कोठडीतील त्रुटीबद्दल दुसऱ्या अधिकाऱ्याला नोटीस बजावली आहे.सहाय्यक तुरुंग अधीक्षक इरन्ना रंगपूर यांना कथित निष्काळजीपणाबद्दल निलंबित करण्यात आले आहे. तुरुंग अधीक्षक अंशुच कुमार यांना सुरक्षेतील त्रुटीबद्दल स्पष्टीकरण मागण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आणि केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे भाचे असलेल्या रेवण्णा यांना बलात्कार आणि धमकीच्या आरोपाखाली गेल्या वर्षी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.प्रज्वलच्या कौटुंबिक फार्महाऊसवर काम करणाऱ्या एका ४७ वर्षीय महिलेने एप्रिल २०२४ मध्ये त्याच्या विरोधात एफआयआर दाखल केला. तिने प्रज्वलवर २०२१ पासून तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याचा आणि या घटनेबद्दल कोणाला सांगितल्यास व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. १ ऑगस्ट २०२५ रोजी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने प्रज्वलला दोषी ठरवले. दुसऱ्या दिवशी, २ ऑगस्ट रोजी, त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि ११.५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यापैकी ११.२५ लाख रुपये पीडितेला देण्याचे निर्देश देण्यात आले होते. प्रज्वलवर बलात्काराची आणखी तीन प्रकरणे प्रलंबित असून, या प्रकरणांची सुनावणी अद्याप सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे