
मुंबई,12 ऑगस्ट (हिं.स.) : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी पहाटे कुर्ला परिसरात मोठी दुर्घटना घडली. कुर्ला पश्चिमेतील अशोकनगर आणि चिराग नगर परिसरात भूस्खलन होऊन अनेक घरांवर माती आणि मलबा कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मलब्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ही घटना बुधवारी पहाटे सुमारे 3 ते 3.48 वाजण्याच्या दरम्यान घडली.
कुर्ल्यातील राठोड मेडिकलजवळील चिराग नगर येथील गौसिया चाळ तसेच घाटकोपर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अशोकनगर परिसरात भूस्खलन झाले. रात्रीच्या अंधारात आणि मुसळधार पावसात अचानक मलबा कोसळल्याने अनेक घरांना त्याचा फटका बसला.
डीसीपी गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सतत सुरू असलेल्या पावसामुळे अशोकनगर परिसरात भूस्खलनाची घटना घडली. सुरुवातीला मलब्याखाली 4 ते 5 जण अडकले असल्याची माहिती होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 6 ते 8 जण मलब्याखाली अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलिस, एनडीआरएफ, 108 रुग्णवाहिका सेवा आणि महापालिकेच्या वॉर्ड कर्मचाऱ्यांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. मलबा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी संयुक्त बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या दुर्घटनेत काही जण जखमी झाल्याचेही समोर आले आहे. 18 वर्षीय सोहेल अन्सारी आणि 14 वर्षीय मोहम्मद अन्सारी यांचा जखमींमध्ये समावेश आहे. दरम्यान, घटनास्थळावरून सापडलेले मृतदेह पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
प्रशासनाकडून मलबा हटवण्याचे काम वेगाने सुरू असून, मलब्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध बचाव पथकांकडून घेतला जात आहे.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी