
अमरावती, 12 ऑगस्ट (हिं.स.)
चातुर्मासाला २५ जुलैपासून सुरवात झाली असली, तरी धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवांच्या पर्वणीला आता श्रावण महिन्यापासून सुरवात होणार आहे. उद्या गुरुवारपासून श्रावणमासारंभ होत असून, त्यानंतर नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी आदी सणांची मालिकाच सुरू होणार आहे. श्रावणापासून कार्तिकी एकादशीपर्यंत तब्बल चार महिने भक्ती, उत्साह आणि मांगल्याचे वातावरण राहणार आहे. त्यामुळे घराघरांत चैतन्याचे वातावरण, तर बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येणार आहे. सणांच्या या मालिकेची सांगता २१ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीने होणार असल्याने श्रावणापासून कार्तिकी एकादशीपर्यंतचा काळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. श्रावण महिन्याला भारतीय संस्कृतीत विशेष धार्मिक महत्त्व आहे. या महिन्यात विविध व्रत-वैकल्ये, पूजाअर्चा आणि धार्मिक उपक्रमांना सुरवात होते. श्रावणी सोमवारी भगवान शंकराची उपासना, तर मंगळवारी मंगळागौरीचे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केले जाणार आहेत. सत्यनारायण पूजेसह विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे घरोघरी आनंदाचे वातावरण राहणार आहे. १७ ऑगस्ट रोजी नागपंचमी, २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन, तर ४ सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होणार आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील धार्मिक वातावरण अधिकच बहरणार आहे.
अधिकमासामुळे सणांचे वेळापत्रक पुढे
श्रावण महिन्यापासून सुरू होणाऱ्या व्रत-वैकल्यांना आणि सणांना भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. यंदा अधिकमास आल्यामुळे श्रावण, भाद्रपद व आश्विन महिन्यातील सण-उत्सव गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारण १८ ते २० दिवसांनी उशिरा येणार आहेत. त्यामुळे सणांच्या तारखांमध्ये बदल झाला असून, यंदाचे सण-उत्सवांचे वेळापत्रक पुढे सरकले आहे.
नोव्हेंबरमध्ये दिवाळीचा प्रकाशोत्सव
नवरात्रोत्सव आणि दसऱ्यानंतर अवघ्या काही दिवसांत दिवाळीचा प्रकाशोत्सव सुरू होणार आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिवाळी साजरी होणार असून, आठ नोव्हेंबर रोजी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी येणार आहे. दिवाळीच्या विविध दिवसांमुळे घराघरांत उत्साहाचे वातावरण राहणार असून, बाजारपेठांमध्येही खरेदीची लगबग वाढणार आहे.
गणेशोत्सवाने, नवरात्रोत्सवाने वाढणार उत्साह
श्रावणानंतरच्या सणांच्या मालिकेत सर्वाधिक उत्सुकता असलेल्या गणेशोत्सवाला १४ सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थीपासून सुरवात होणार आहे. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होईल. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत देवीच्या उपासनेसह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. २० ऑक्टोबर रोजी दसरा साजरा होणार आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी