आंबेनळी घाट मार्ग १६ ऑगस्टपर्यंत बंद; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
रायगड, 12 ऑगस्ट (हिं.स.)। : भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर-महाबळेश्वर आंबेनळी घाट राज्य महामार्ग क्रमांक १३९ वरील वाहतूक १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
Ambenali Ghat route closed until August 16; administration's decision in view of heavy rainfall.


रायगड, 12 ऑगस्ट (हिं.स.)। : भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर-महाबळेश्वर आंबेनळी घाट राज्य महामार्ग क्रमांक १३९ वरील वाहतूक १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने हा आदेश जारी केला आहे.

आंबेनळी घाट परिसरातील भौगोलिक परिस्थिती, दरडी कोसळण्याची शक्यता आणि मुसळधार पावसामुळे निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूकबंदी कायम ठेवली आहे. यापूर्वीही हा मार्ग ७ जुलै ते ३१ जुलैदरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेत तहसीलदार, पोलादपूर यांनी वाहतूकबंदीची मुदत वाढविण्याची विनंती केली होती.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून या मार्गावर दरड हटविणे, पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवणे, संरक्षक भिंतींची दुरुस्ती तसेच अन्य सुरक्षा उपाययोजना सुरू आहेत. मात्र, अतिवृष्टीदरम्यान दरडी कोसळणे, रस्त्यावर माती व दगड येणे यासारख्या घटना अचानक घडू शकतात. त्यामुळे कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

घाटातील धोकादायक परिस्थितीमुळे प्रवाशांच्या जीविताला तसेच वाहनांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी बंद असलेल्या मार्गावरून प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आंबेनळी घाट मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक जीवित आणि मालमत्तेची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande