वणीतील ६०० एकर शेतजमिनीचा प्रश्न तातडीने सोडवा; अन्यथा वेकोलीचा कोळसा बाहेर जाऊ देणार नाही
बच्चू कडू यांचा प्रशासन आणि वेकोली व्यवस्थापनाला इशारा यवतमाळ, १२ ऑगस्ट (हिं.स.) : वणी परिसरातील तब्बल ६०० एकर शेतजमिनीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, १७५ हून अधिक शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. हा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास आं
प्रश्न न सुटल्यास वेकोलीचा कोळसा रोखू बच्चू कडू यांचा इशारा; वणी येथे प्रकल्पग्रस्त शेतकर्!यांची सभा


बच्चू कडू यांचा प्रशासन आणि वेकोली व्यवस्थापनाला इशारा

यवतमाळ, १२ ऑगस्ट (हिं.स.) : वणी परिसरातील तब्बल ६०० एकर शेतजमिनीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, १७५ हून अधिक शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. हा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास आंदोलनाची दिशा अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी दिला.

वणी परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी कडू यांनी प्रशासन तसेच वेकोली व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न प्रलंबित ठेवून विकासाची भाषा करणे योग्य नाही. प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

लोकशाही मार्गाने प्रश्न सुटला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न लोकशाही मार्गाने सुटला नाही, तर वणी परिसरातून वेकोलीचा एक कणही कोळसा बाहेर जाऊ देणार नाही, असा थेट इशारा बच्चू कडू यांनी दिला. त्यामुळे वणीतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कडू यांनी आपल्या आंदोलनाच्या भूमिकेबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. “आमचा लढा कोणत्याही पक्षासाठी नाही. आम्ही शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि कष्टकरी जनतेसाठी लढतो,” असे त्यांनी सांगितले. जात आणि धर्माच्या राजकारणापेक्षा कष्टकरी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वणी परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास आंदोलनाची दिशा अधिक तीव्र करण्याचा इशारा कडू यांनी दिल्याने प्रशासन आणि वेकोली व्यवस्थापनासमोर आव्हान उभे राहिले आहे. आता ६०० एकर जमिनीच्या प्रश्नावर प्रशासन आणि वेकोली व्यवस्थापन कोणता निर्णय घेते, याकडे शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande