
यवतमाळ, 12 ऑगस्ट (हिं.स.)।
शहरी मार्गावर नव्या एसटी बस धावत असताना ग्रामीण भागातील प्रवाशांच्या वाट्याला मात्र जुन्याच, खिळखिळ्या लालपरी येत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उमरखेड आगारातील ग्रामीण मार्गांवर अनेक जुन्या बस धावत असून, बसची अवस्था खराब असल्याने प्रवासादरम्यान बिघाड होण्याचे प्रकार वाढले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात एसटीवर अवलंबून आहे. मात्र, ग्रामीण मार्गावर धावणार्!या अनेक बसमध्ये खराब आसने, खिडक्यांची दुरवस्था, दरवाजांचे तुटलेले भाग, मोठ्या प्रमाणात होणारा आवाज आणि तांत्रिक त्रुटी आढळून येत असल्याच्या तक्रारी आहेत. काही बस रस्त्यातच बंद पडत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. एसटी महामंडळाकडून नव्या बस उपलब्ध होत असताना त्यातील काही बस ग्रामीण मार्गांवरही देण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांकडूनही तिकिटाचे पूर्ण भाडे आकारले जाते. त्यामुळे बसच्या गुणवत्तेबाबत भेदभाव नको, ग्रामीण भागातून दररोज विद्यार्थी शिक्षणासाठी उमरखेडसह इतर शहरांमध्ये ये-जा करतात. बस उशिरा येणे, बसमध्ये बिघाड होणे किंवा बस रद्द होणे यामुळे विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात पोहोचण्यास विलंब होतो. त्यामुळे शैक्षणिक वेळापत्रकावरही परिणाम होत असल्याचा पालकांचा आरोप आहे.
जुन्या बस सेवेतून कमी करा ग्रामीण मार्गांवर धावणार्!या जुन्या बसची तातडीने तांत्रिक तपासणी करावी, प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणार्!या बस सेवेतून कमी कराव्यात आणि त्यांच्या जागी नव्या बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. उमरखेड आगार प्रशासनाने ग्रामीण प्रवाशांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
--------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी