
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या अमेरिकेतील वैज्ञानिक शैक्षणिक सहलीला शासनाचा हिरवा कंदील
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या घोषणेची पूर्तता
छत्रपती संभाजीनगर, १२ ऑगस्ट (हिं.स.) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक स्वप्नांना आता थेट अमेरिकेतील NASAची दिशा मिळणार आहे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या घोषणेची पूर्तता झाली असून, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अमेरिकेतील वैज्ञानिक शैक्षणिक सहलीसाठी तब्बल २ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करून वितरित करण्यात आला आहे.
जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांनी यासंदर्भात प्रशासकीय आदेश जारी केला आहे. त्यामुळे ‘धाराशिव ते नासा’ ही संकल्पना आता केवळ घोषणेपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
घोषणेपासून अंमलबजावणीपर्यंत वेगवान प्रक्रिया
धाराशिवच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील वैज्ञानिक संस्थांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, त्यांच्या कल्पनाशक्तीला नवी भरारी मिळावी आणि विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या उपक्रमाची घोषणा केली होती.
घोषणेची प्रभावी अंमलबजावणी करत जिल्हा प्रशासनाने आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली आहे. सन २०२६-२७ च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत या उपक्रमाला मान्यता देण्यात आली असून, निधी वितरणाचाही महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.
पाठ्यपुस्तकातील विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव
अंतराळ, रॉकेट, उपग्रह, अवकाश संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती केवळ पाठ्यपुस्तकांपुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
NASAसारख्या जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक संस्थेला भेट दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची जिज्ञासा आणि नवकल्पनांची प्रेरणा निर्माण होण्यास मदत होणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला जागतिक वैज्ञानिक क्षेत्राची ओळख करून देणारी ही संधी त्यांच्या भविष्यातील वाटचालीला नवी दिशा देणारी ठरणार आहे.
‘गावातील शाळा ते नासा’ — स्वप्नांना मिळणार आकाश
ज्या विद्यार्थ्यांनी नासा केवळ पाठ्यपुस्तकात, छायाचित्रांमध्ये किंवा मोबाईलच्या पडद्यावर पाहिले आहे, त्यांना आता या जागतिक वैज्ञानिक संस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. गावातील साध्या शाळेच्या वर्गखोलीतून सुरू झालेला ज्ञानाचा प्रवास आता जगातील अग्रगण्य वैज्ञानिक संस्थेपर्यंत पोहोचणार आहे.
ही केवळ परदेशातील शैक्षणिक सहल नसून, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला जागतिक व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा आणि त्यांच्या प्रतिभेला शासनाचा विश्वास मिळणार आहे.
धाराशिवच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा
२ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करून वितरित झाल्याने या उपक्रमाला भक्कम आर्थिक पाठबळ मिळाले आहे.
प्रशासकीय आदेशामुळे पुढील कार्यवाहीलाही गती मिळणार आहे.
“धाराशिवच्या विद्यार्थ्यांनी आकाशाकडे केवळ पाहू नये, तर आकाशाचा वेध घ्यावा; त्यांची स्वप्ने मोठी असावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी उभे राहावे,” या भावनेतून साकारत असलेला हा उपक्रम जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या घोषणेपासून निधी वितरणाच्या प्रशासकीय आदेशापर्यंतचा हा प्रवास म्हणजे धाराशिवच्या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक स्वप्नांना मिळालेली शासनाची ठोस साथ असल्याचे मानले जात आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis