
छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। फलोदी अपघात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा महामार्ग सुरक्षा कृती दल (DHSTF) स्थापन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा कृती दलाची स्थापना केल्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहेत.
जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या अध्यक्षतेखालील या कृती दलामार्फत महामार्गांवरील अतिक्रमणे हटविणे, अनधिकृत पार्किंगला आळा घालणे, ब्लॅकस्पॉट्सवर आवश्यक उपाययोजना, रस्ते व स्ट्रीट लाईटची सुधारणा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा सक्षम करणे तसेच महामार्ग सुरक्षेबाबत ‘Zero Tolerance’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या समितीचे अध्यक्ष स्वतः जिल्हाधिकारी हे असून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक हे सदस्य सचिव आहेत. पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रादेशीक परिवहन अधिकारी, अधीक्षक अभियंता- सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता सा.बां.विभाग, नॅशनल हायवे व अहिल्यानगर, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी मनपा आदी या समितीचे सदस्य आहेत.
या समितीची बैठक दर १५ दिवसांनी होऊन आढावा घेतला जाणार आहे. महामार्ग सुरक्षेबाबत उल्लंघन करणाऱ्यांवर शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबिण्यात येणार आहे. या उपाययोजनांमध्ये राष्ट्रीय महामार्ग हद्दीत बेकायदेशीर ढाबे, हॉटेल्स, दुकाने, टपऱ्या हटविणे, महामार्ग सुरक्षा क्षेत्रात व्यावसायिक व इमारत बांधकामांना नवीन परवाने देण्यास व जुन्या परवान्यांचे नुतनीकरण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अस्तित्वात असलेल्या सर्व परवान्यांची ३० दिवसांच्या आत तपासणी केली जाणार आहे. महामार्गालगत बेकायदेशीर पार्कींगवर बंदी घालण्यात आली आहे. बेकायदा पार्कींग, अतिवेग रोखण्यासाठी डिजीटल प्रणालीचा वापर केला जाईल. तसेच हायवे पेट्रोलिंग टीम तैनात करण्यात याव्यात. अपघात प्रवण क्षेत्रांची दुरुस्ती करण्यासाठी चिन्हके, पदथदिवे, क्रॅश बॅरियर लावून दुरुस्ती करण्यात याव्या, तसेच आपत्कालिन वैद्यकीय सेवा रुग्णवाहिका, जड क्रेन आदींची उपलब्धता २४ तास तैनात ठेवण्यात यावी असे आदेशात सष्ट करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis