

रायगड, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। महिलांना उद्योजकतेच्या माध्यमातून आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआय), अहमदाबाद यांच्याकडून राबविण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद आहेत. महिलांना व्यवसायाची दिशा, आवश्यक कौशल्ये आणि आत्मविश्वास देण्यासाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांची गरज असून, रायगड जिल्ह्यातील महिलांना उद्योजकतेच्या प्रवाहात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले.
भारतीय उद्योजकता विकास संस्था, अहमदाबाद, उद्योजकता विकास प्रकल्प कार्यालय, अलिबाग आणि टाटा कम्युनिकेशन्स, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रोहा तालुक्यातील कोलाड येथे महिलांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात अदिती तटकरे बोलत होत्या.
महिलांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर होण्यासाठी सक्षम करण्याचे ईडीआयचे कार्य निश्चितच महत्त्वाचे असल्याचे तटकरे यांनी सांगितले. प्रशिक्षणामुळे महिलांमध्ये व्यवसाय सुरू करण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो आणि आर्थिक स्वावलंबनाची दिशा मिळते. संपूर्ण राज्यातून या उपक्रमासाठी रायगड जिल्ह्याची निवड केल्याबद्दल ईडीआय आणि टाटा कम्युनिकेशन्सचे त्यांनी आभार मानले.
ईडीआयचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश सोळंकी यांनी प्रकल्पाची माहिती देताना प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये, मार्गदर्शन आणि विविध शासकीय योजनांची माहिती दिली जात असल्याचे सांगितले. प्रशिक्षणार्थी वैशाली कुंडे आणि ज्योत्सना कांबळे यांनी प्रशिक्षणामुळे व्यवसाय सुरू करण्यासाठी आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले.
कार्यक्रमास रोहा पंचायत समितीच्या सभापती विजया पाशिलकर, रोहा नगराध्यक्षा वनश्री शेडगे, उपसभापती संजय मंडलुस्कर, गटनेते महेंद्र गुजर, गौरी बारटक्के, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, ईडीआयचे प्रकल्प अधिकारी शशिकांत दनोरीकर यांच्यासह प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.
रोहा, धाटाव, खांब, नागोठणे, कोलाड, आंबेवाडी, संभे, म्हस्करवाडी आणि भुवनेश्वर येथील महिलांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)