महानगर गॅसचे बिल भरण्याची सुविधा रत्नागिरीतील पोस्टात सुरू
रत्नागिरी, 12 ऑगस्ट (हिं.स.) । रत्नागिरी शहरात जवळपास १० ते १२ हजार ग्राहकांकडे महानगर गॅस सुरू आहे. त्यांना आता रत्नागिरीतील पोस्टात बिल भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. गॅसचे बिल भरण्याकरिता शहरात फक्त ऑनलाइन व कार्यालयात जाऊन पैसे भरण्याची
महानगर गॅसचे बिल भरण्याची सुविधा रत्नागिरीतील पोस्टात सुरू


रत्नागिरी, 12 ऑगस्ट (हिं.स.) । रत्नागिरी शहरात जवळपास १० ते १२ हजार ग्राहकांकडे महानगर गॅस सुरू आहे. त्यांना आता रत्नागिरीतील पोस्टात बिल भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

गॅसचे बिल भरण्याकरिता शहरात फक्त ऑनलाइन व कार्यालयात जाऊन पैसे भरण्याची सुविधा होती. यामुळे ग्राहकांची होणारी गैरसोय टाळण्याकरिता महानगर गॅस व टपाल विभागाने सामंजस्य करार केला असून आता शहरातील सर्व टपाल कार्यालयात बिल भरणा सुविधा सुरू झाली आहे. डाकघर अधीक्षक ज्ञानेश्वर कुलकर्णी आणि महानगर गॅसचे प्रमुख आशीष प्रसाद यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही अधिकाऱ्यांनी माहिती दिली. महानगर गॅसचे ग्राहक वाढत असून ते शहराच्या विविध भागांमध्ये वास्तव्यास आहेत. त्यामुळे बिल भरणा केंद्रापर्यंत जाणे काही ग्राहकांसाठी गैरसोयीचे ठरत होते. ही अडचण लक्षात घेऊन महानगर गॅसने भारतीय डाक विभागाशी संपर्क साधून डाक कार्यालयाच्या माध्यमातून बिल भरण्याची सुविधा सुरू करण्याची प्रायोगिक प्रणाली पडताळण्यात आली. डाक विभागाचे व्यापक नेटवर्क आणि नागरिकांशी असलेले दैनंदिन संर्पकाचे नाते लक्षात घेता या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.

या करारामुळे रत्नागिरी शहरातील सर्व टपाल कार्यालयात महानगर गॅसचे मासिक बिल भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामध्ये रत्नागिरी प्रधान डाकघर, रत्नागिरी कलेक्टरेट एस.ओ., शिवाजीनगर एस.ओ., एम.आय.डी.सी. (रत्नागिरी) एस.ओ. तसेच शहरातील इतर सर्व टपाल कार्यालयांचा समावेश आहे. ग्राहकाचे जेवढे बिल आहे तेवढेच भरून घेतले जाईल. टपाल कार्यालयात फक्त बिल भरण्याचा विषय असून गॅस पुरवठ्यासंबंधीच्या तक्रारी महानगर गॅसच्या कार्यालयात ऐकून घेतल्या जातील, अशी माहिती आशीष प्रसाद यांनी दिली.

भारतीय डाक विभागामार्फत नागरिकांना स्पीड पोस्टद्वारे देश-विदेशात टपाल व राखी पाठवणे, पार्सल पिकअप सेवा, टपाल जीवन विमा, विविध बचत योजना, लॉजिस्टिक सेवा, पासपोर्ट सेवा, आधार नोंदणी व अद्ययावत करण्याची सुविधा अशा विविध नागरिक-केंद्रित सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या सुविधांमध्ये आता महानगर गॅस बिल भरणा सेवेचीही भर पडली आहे. भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजेशी संबंधित विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना या सुविधेमुळे आणखी बळकटी मिळणार आहे.

लवकरच महानगर गॅसचे बिल पोहोचवण्याची सेवाही पोस्टमनमार्फत सुरू होणार आहे. तसेच गॅसचे रीडिंग घेण्याचे कामही पोस्टमन करणार आहेत. पोस्टमन बिल पोहोचवण्याकरिता येतील, त्याच वेळी त्यांच्याकडे बिल भरणाही करता येण्याच्या दृष्टीने ग्राहकांना सुविधा देण्याचा विचार आहे. असे रत्नागिरी विभागाचे डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande