लातूर : रस्ते, पाणी प्रश्नावरून चाकूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक
लातूर, 12 ऑगस्ट (हिं.स.)। चाकूर आणि सरणवाडी शिवारातील रस्ते व पाण्याच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. पाझर तलावामुळे सरणवाडी ते होनाळी तसेच चाकूर ते नायगाव हे रस्ते बंद झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतीकडे जाण्या-येण्यास मोठ
शेतकरी  आक्रमक


लातूर, 12 ऑगस्ट (हिं.स.)। चाकूर आणि सरणवाडी शिवारातील रस्ते व पाण्याच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. पाझर तलावामुळे सरणवाडी ते होनाळी तसेच चाकूर ते नायगाव हे रस्ते बंद झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतीकडे जाण्या-येण्यास मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

गेल्या २५ ते ३० वर्षांपासून वापरात असलेला गट क्रमांक १० आणि १८ मधील वहिवाटीचा रस्ताही बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडथळे निर्माण झाले आहेत. शेतीच्या कामांसाठी वाहने, जनावरे आणि शेतमालाची ने-आण करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. बंद झालेले रस्ते तातडीने पूर्ववत करावेत, आवश्यक ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, तसेच पाझर तलावातील पाणी जनावरांना पिण्यासाठी आणि झाडांसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाला मागण्या सोडविण्यासाठी आठ दिवसांची मुदत देत हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान, या आठ दिवसांच्या कालावधीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच गरज पडल्यास उपोषण करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेते, याकडे चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande