
छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे यापुढील ध्येय न राहता,उत्पादित होणाऱ्या शेतीमालाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.शेतीशी निगडित घटकांमध्ये जगभरात सातत्याने होत असलेले बदल आणि विकसित होत असलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या गरजेनुसार योग्य वेळी पोहोचविणे,तसेच त्यासाठी आवश्यक सहाय्य व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सन २०२६-२७ मध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे आयोजित करण्यात येणार आहेत. राज्यपुरस्कृत या योजनेअंतर्गत युरोप व चीन या देशांची निवड करण्यात आली आहे.
परदेश अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान,शेतीमालाची गुणवत्ता सुधारण्यासाठीच्या पद्धती, उत्पादनातील नवीन तंत्रज्ञान तसेच शेतीशी निगडित विकसित पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने विविध निकष निश्चित केले आहेत.अभ्यास दौऱ्यासाठी जाणारा लाभार्थी स्वतः शेतकरी असणे आवश्यक असून, त्याच्या स्वतःच्या नावे चालू कालावधीचा ७/१२ व ८-अ उतारा असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्याचे उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे आणि त्याबाबत त्याने प्रपत्र-२ मध्ये स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.तसेच शेतकऱ्याचा अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.
कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ
एका शेतकरी कुटुंबातून केवळ एका व्यक्तीलाच या योजनेचा लाभ घेता येईल. निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्याने स्वखर्चाने इतर कुटुंबीयांना सोबत नेण्याची इच्छा व्यक्त केली तरी सहल व्यवस्थापनास येणाऱ्या संभाव्य अडचणींमुळे त्यांना परवानगी दिली जाणार नाही.अर्जासोबत शिधापत्रिकेची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.कुटुंबाच्या व्याख्येत पती, पत्नी आणि १८ वर्षांखालील मुले-मुली यांचा समावेश आहे.शेतकऱ्याने आधार प्रमाणपत्राची प्रतही अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
वयाची अट आणि वैद्यकीय प्रमाणपत्र
अभ्यास दौऱ्याला निघण्याच्या दिवशी शेतकऱ्याचे किमान २५ वर्षे वय पूर्ण झालेले असावे. कमाल वयाची अट नाही.मात्र, शेतकरी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे बंधनकारक आहे.अर्ज सादर करताना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे किमान एम.बी.बी.एस.डॉक्टरचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्टधारक) असणे आवश्यक असून,पासपोर्टची मुदत किंवा वैधता दर्शविणाऱ्या पानाची छायांकित प्रत जोडावी लागेल. अर्ज सादर करताना पासपोर्टची वैधता किमान एक वर्ष असणे आवश्यक आहे.
नोकरी करणाऱ्यांना पात्रता नाही
अर्जदार शेतकरी शासकीय, निमशासकीय,सहकारी किंवा खासगी संस्थेत नोकरी करणारा नसावा.तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर,वकील,सीए (चार्टर्ड अकाउंटंट),अभियंता,कंत्राटदार आदी व्यवसाय करणारा नसावा. याबाबत त्याने प्रपत्र-२ मध्ये स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.यापूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत, कृषी विद्यापीठामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत अर्थसहाय्य घेऊन विदेश दौरा केलेला नसावा. याबाबतही शेतकऱ्याने प्रपत्र-२ मध्ये स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.
निवडीनंतरही वैद्यकीय तपासणी
कृषी विभागाकडून अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याचे पत्र मिळाल्यानंतर शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे किमान एम.बी.बी.एस. डॉक्टरचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.तसेच कोरोनाविषयक तपासणी करून त्याचा अहवाल कृषी आयुक्तालयास सादर करणे बंधनकारक आहे.या अहवालानुसार शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झालेली नसल्याचे आणि सलग ७ ते १० दिवसांचा परदेश दौरा करण्यास तो शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे.
५० टक्के किंवा दोन लाखांपर्यंत अनुदान
शासनाकडून अभ्यास दौऱ्यासाठी सर्व घटकांतील (संवर्गांतील) शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त दोन लाख रुपये,यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय राहणार आहे.
धाराशिवला पाच शेतकऱ्यांचा लक्ष्यांक
या अभ्यास दौऱ्यासाठी जिल्ह्याला पाच शेतकऱ्यांचा लक्ष्यांक देण्यात आला आहे.यामध्ये एक महिला शेतकरी,एक केंद्र किंवा राज्यस्तरावरील विविध कृषी पुरस्कार प्राप्त अथवा पीक स्पर्धा विजेता शेतकरी आणि इतर तीन शेतकरी यांचा समावेश आहे. लक्ष्यांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरावर सोडत काढून ज्येष्ठता क्रमवारीनुसार शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे.
ही कागदपत्रे आवश्यक
अर्जासोबत चालू सहा महिन्यांचा ७/१२ उतारा,आधार कार्डची प्रत, रेशनकार्डची प्रत,डॉक्टरांकडून मिळालेले तंदुरुस्ती प्रमाणपत्र आणि वैध पासपोर्टची प्रत जोडणे आवश्यक आहे.
१७ ऑगस्टपर्यंत अर्ज करा
या अभ्यास दौऱ्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी दि.१० ऑगस्ट २०२६ ते दि.१७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत कार्यालयीन वेळेत अर्ज करावा.अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis