
बीड, 12 ऑगस्ट (हिं.स.)। अंबाजोगाई तालुक्यातील धावडी येथील घरकुल लाभार्थ्यांचे थकीत हप्ते त्वरित वितरित न केल्यास येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा खळबळजनक इशारा गावचे माजी सरपंच नारायण सखाराम घुले यांनी दिला आहे. पंचायत समितीच्या अभियंत्याकडून पैशांच्या लालसेपोटी जाणीवपूर्वक हे हप्ते अडवले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
धावडी गावातील अनेक घरकुल लाभार्थ्यांची घरे पूर्ण झाली आहेत, तर काहींचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, हप्ते न मिळाल्यामुळे गरिबांच्या घरांची कामे अर्धवट स्थितीत बंद पडली आहेत. यापूर्वी १७ जुलै २०२६ रोजी निवेदनाद्वारे हप्ते देण्याची विनंती करूनही पंचायत समितीच्या संबंधित अभियंत्याने केवळ आर्थिक देवाणघेवाणीच्या अपेक्षेने हे हप्ते जाणीवपूर्वक रोखून धरले आहेत, असा थेट आरोप माजी सरपंच घुले यांनी केला आहे. प्रशासनाच्या या लालफीतशाही आणि मनमानी कारभारामुळे संताप व्यक्त करत त्यांनी अंतिम इशारा पत्र पंचायत समितीला दिले आहे.
येत्या काही दिवसांवर स्वातंत्र्यदिन येऊन ठेपला असून, तोपर्यंत गरिबांचे हप्ते वितरित न झाल्यास आपण १५ ऑगस्ट रोजी जेथे असू तिथे आत्मदहन करू, अशी ठाम भूमिका नारायण घुले यांनी घेतली आहे. या संभाव्य अनुचित प्रकाराला सर्वस्वी अंबाजोगाई पंचायत समिती कार्यालय आणि शासन जबाबदार राहील, असेही त्यांनी या पत्रात ठणकावून सांगितले आहे. या पत्राच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री, बीडचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तसेच अंबाजोगाईचे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis