
मुंबई, 12 ऑगस्ट (हिं.स.)। गुगलच्या जेमिनी अॅपने जगभरात १ अब्ज युजर्सचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती जाहीर केली. जेमिनी हे गुगलच्या इतिहासातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उत्पादनांपैकी एक असल्याचं पिचाई यांनी म्हटलं आहे. या यशाबद्दल त्यांनी गुगल लॅब्सचे उपाध्यक्ष जोश वूडवर्ड तसेच संपूर्ण जेमिनी टीमचं अभिनंदन केलं.
गुगलच्या जनरेटिव्ह एआयचा प्रवास सुरुवातीला संभाषणात्मक चॅटबॉटपासून सुरू झाला. कंपनीनं बार्ड हे एआय चॅटबॉट लाँच केलं होतं. ते सुरुवातीला लाएमडीए तंत्रज्ञानावर आधारित होतं. त्यानंतर गुगलनं पाल्म २ मॉडेलचा समावेश करून बार्डच्या रीझनिंग, कोडिंग, गणित आणि बहुभाषिक क्षमतांमध्ये सुधारणा केली. पुढे कंपनीनं जेमिनी हे नवीन पिढीचं मल्टीमोडल एआय मॉडेल सादर केलं. मजकूर, प्रतिमा, ऑडिओ, व्हिडिओ आणि कोड अशा विविध प्रकारच्या माहितीवर प्रक्रिया करण्याची क्षमता जेमिनीकडे आहे.
जेमिनी १.५ च्या आगमनानंतर मोठ्या प्रमाणातील माहिती एकाच संवादात प्रक्रिया करण्याची क्षमता वाढली. त्यामुळे लांब दस्तऐवज, मोठे कोडबेस आणि मल्टीमीडिया सामग्री हाताळणे अधिक सुलभ झालं. जेमिनी २.० मध्ये वापरकर्त्याच्या प्रश्नांना उत्तर देण्यापलीकडे जाऊन त्याचा हेतू समजून घेणे, विविध टूल्सचा वापर करणे आणि एखादं काम पूर्ण करण्यासाठी अनेक टप्प्यांमध्ये कृती करणे यावर भर देण्यात आला.
आज जेमिनी केवळ स्वतंत्र चॅटबॉट राहिलेला नसून गुगलच्या विविध उत्पादनांमधील महत्त्वाचा एआय स्तर बनला आहे. सर्च, वर्कस्पेस, अँड्रॉइड यांसह गुगलच्या अनेक सेवांमध्ये जेमिनीची वैशिष्ट्ये समाविष्ट केली जात आहेत. कंपनीकडून अधिक सक्षम आणि तुलनेनं कमी खर्चातील मॉडेल्स विकसित करण्यावरही भर दिला जात आहे. १ अब्ज युजर्सचा टप्पा हा जेमिनीवरील वाढता विश्वास आणि त्याची दैनंदिन उपयुक्तता दर्शवणारा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आगामी काळात अधिक सक्षम एजंटिक सिस्टीम्स, प्रगत मल्टीमोडल अनुभव आणि कमी खर्चातील उच्च-कार्यक्षमतेच्या एआय मॉडेल्सच्या विकासाला वेग मिळण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule