
जामगाव खडका ग्रामपंचायतमधील प्रकरण
अमरावती, 12 ऑगस्ट (हिं.स.)।जामगाव खडका ग्रामपंचायतच्या चार सदस्यांना अपात्र ठरविणाऱ्या विभागीय आयुक्तांच्या आदेशाला नागपूर उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे चारही सदस्यांना तूर्तास मोठा दिलासा मिळाला असून ते ग्रामपंचायतच्या कामकाजात सहभागी होऊ शकणार आहेत. विभागीय आयुक्तांनी चारही सदस्यांना अपात्र ठरविल्यानंतर संबंधित सदस्यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणात अॅड. धनंजय तोटे यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. सुनावणीनंतर न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या अपात्रतेच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे चारही सदस्यांना सध्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जामगाव खडका ग्रामपंचायतीतील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले असून सत्तासमीकरणांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चार सदस्यांच्या अपात्रतेनंतर ग्रामपंचायतीतील सत्तासंतुलन बदलण्याची चर्चा सुरू होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे त्या प्रक्रियेला तूर्तास स्थगिती मिळाली आहे. दरम्यान, हा केवळ अंतरिम आदेश असून प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयात होणार आहे. त्यामुळे अंतिम निकालाकडे ग्रामस्थांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी