अमरावती : १०२ रुग्णवाहिका चालकांचे मानधन थकीत, १४ ऑगस्टपासून बेमुदत कामबंदचा इशारा
अमरावती, 12 ऑगस्ट (हिं.स.) जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांवर १०२ रुग्णवाहिकेवर चालक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे जून आणि जुलै महिन्यांचे मानधन थकीत असून भविष्यनिर्वाह निधी (ईपीएफ) भरण्यातही अनियमितता झाल्याचा आरोप चालकांनी केला आहे. वा
१०२ रुग्णवाहिका चालकांचे मानधन थकीत


अमरावती, 12 ऑगस्ट (हिं.स.) जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांवर १०२ रुग्णवाहिकेवर चालक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे जून आणि जुलै महिन्यांचे मानधन थकीत असून भविष्यनिर्वाह निधी (ईपीएफ) भरण्यातही अनियमितता झाल्याचा आरोप चालकांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याने संतप्त चालकांनी १४ ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

जिल्हा परिषदेच्या निविदाप्रक्रियेतून एप्रिल २०२६ पासून रुग्णवाहिका चालकांची नियुक्ती करण्यात आली. यासाठी पुणे व अमरावती येथील कंत्राटदारांकडे चालकांची जबाबदारी देण्यात आली आहे. ई-निविदेच्या अटींनुसार कर्मचाऱ्यांचे मानधन प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपूर्वी अदा करणे तसेच भविष्यनिर्वाह निधीसह अन्य शासकीय कपातींचा वेळेत भरणा करणे अपेक्षित आहे. मात्र चालकांच्या म्हणण्यानुसार पुणे येथील कंत्राटदारांनी केवळ एप्रिल महिन्याचा ईपीएफ भरला असून जून व जुलै महिन्याचे मानधन थकीत आहे. दुसरीकडे अमरावती येथील कंत्राटदाराने एप्रिल आणि मे महिन्याचा ईपीएफ भरला असून जून व जुलैचे मानधन अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे चालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका सेवा ही अत्यावश्यक आहे, अशा परिस्थितीत चालकांचे मानधन थकीत राहिल्यास त्याचा थेट परिणाम त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहावर होण्याबरोबरच आरोग्यसेवेवरही होण्याची शक्यता आहे. विशेषतः मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे १४ ऑगस्टपूर्वी थकीत मानधन व ईपीएफचा प्रश्न निकाली काढून चालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. अन्यथा १४ ऑगस्टपासून बेमुदत कामबंद व उपोषण करण्याचा निर्धार १०२ रुग्णवाहिका चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, उपाध्यक्ष अनवर खान, सचिव पंकज हाडोळे, कोषाध्यक्ष समीर खान यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन व्यक्त केला आहे.

मानधन व ईपीएफच्या प्रश्नाबाबत २१ जुलै, २८ जुलै आणि ६ ऑगस्ट २०२६ रोजी संबंधित प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून समस्या मांडल्या. मात्र वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित कार्यवाही झाली नाही. कंत्राटदारांकडे मानधनाबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने कामबंद आंदोलन करण्यात येत आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande