विदर्भाच चिखलदऱ्याच्या स्वर्गीय सौंदर्याला पावसाची 'किनार':
अमरावती, 12 ऑगस्ट (हिं.स.)। कुठं डोंगर दिसतोय, कुठं दरी आहे आणि कुठं आभाळ हेच कळू नये, इतकं दाट धुकं. काही क्षणातच समोरचं दृश्य पांढऱ्या धुक्याच्या पडद्याआड अदृश्य होतं आणि पुढच्या क्षणी दरीतून जणू पांढऱ्या ढगांच्या लाटा वर येताना दिसतात. रिमझिम प
विदर्भाच्या नंदनवनात दरीतून वर येतेय धुक्याची लाट ! चिखलदऱ्याच्या स्वर्गीय सौंदर्याला पावसाची 'किनार'


अमरावती, 12 ऑगस्ट (हिं.स.)।

कुठं डोंगर दिसतोय, कुठं दरी आहे आणि कुठं आभाळ हेच कळू नये, इतकं दाट धुकं. काही क्षणातच समोरचं दृश्य पांढऱ्या धुक्याच्या पडद्याआड अदृश्य होतं आणि पुढच्या क्षणी दरीतून जणू पांढऱ्या ढगांच्या लाटा वर येताना दिसतात. रिमझिम पाऊस, अंगाला झोंबणारा वारा आणि धुक्यानं पूर्णपणे वेढलेले डोंगर. सध्या विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्याचं रूप अक्षरशः स्वर्गीय झालं आहे. पावसाळ्यातील या निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक चिखलदाऱ्याकडं धाव घेत आहेत.

पावसाळ्यामुळं चिखलदऱ्याच्या डोंगरदऱ्या हिरव्यागार झाल्या आहेत. त्यातच गतकाही दिवसांपासून परिसरात दाट धुक्याची चादर पसरत असल्यानं चिखलदऱ्याच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. अनेक ठिकाणी परिस्थिती अशी आहे की अगदी काही मीटर अंतरावरील वस्तू देखील धुक्यामुळे स्पष्ट दिसत नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या हेडलाईटचा प्रकाश धुक्यात मिसळला की एक वेगळंच चित्रपटाच्या पडद्यावरचं दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं. दिवसभर धुक्याची हीच स्थिती कायम राहत असल्यानं पर्यटकांसाठी हा निसर्गाचा अनोखा अनुभव ठरत आहे. त्यातच रिमझिम पाऊस आणि सातपुड्याच्या डोंगरातून येणारा थंडगार वारा वातावरणाला अधिकच अल्हाददायक बनवत आहे.

चिखलदऱ्यात सध्या अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल होत आहेत. शनिवारी आणि रविवारी पर्यटकांची गर्दी विशेष वाढत असली तरी आठवड्याच्या इतर दिवशीही चिखलदऱ्यात पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळत आहे. पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनानं वाहतुकीचं नियोजन केलं असून धामणगाव गडी मार्गे चिखलदऱ्याला जाण्याचा आणि घटांग मार्गे परतीचा मार्ग ठेवण्यात आला आहे.

आता पावसाळा असल्यानं चिखलदऱ्याचं वातावरण अतिशय मनमोहक झालं आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेला विदर्भाचा स्वर्ग चिखलदरा हे केवळ थंड हवेचं ठिकाण नाही, तर विदर्भाच्या पर्यटन विश्वातील एक महत्त्वाचं आकर्षण आहे. पावसाळ्यात मात्र चिखलदऱ्याला निसर्ग वेगळंच रूप देतो. हिरवाईनं नटलेले डोंगर, खोल दरी, धबधबे, रिमझिम पाऊस, गार वारा आणि त्यावर पसरलेली धुक्याची पांढरी चादर या सगळ्यांचा संगम सध्या चिखलदऱ्यात अनुभवायला मिळतो. सातपुड्याच्या कुशीत पर्यटनाची मजा घेण्यासाठी येणारे पर्यटक सध्या धुक्यात स्वतःला हरवून घेण्यात रमले आहेत.

दरीतून वर येते धुक्यांची लाट :

चिखलदाऱ्यातील सर्वात आकर्षक दृश्य सध्या दरींमध्ये पाहायला मिळत आहे. खाली साचलेलं धुकं हळूहळू वर सरकत आणि पाहता पाहता संपूर्ण दरी पांढऱ्या ढगांनी भरल्यासारखी दिसते. खरंतर धुकं दरीतून एखाद्या वस्तूप्रमाणं वर येत आहे, वातावरणातील थंड आणि दमट हवेच्या हालचालींमुळे असा भास निर्माण होतो. पावसाळ्यात दरींमध्ये आर्द्रता मोठ्या प्रमाणात असते. रात्री आणि पहाटे डोंगराच्या उतारा वरची हवा थंड होऊन दऱ्यांमध्ये साचते. ही हवा पुरेशी थंड झाली की त्यातील जलवाष्पाचं सूक्ष्म पाण्याच्या थेंबा मध्ये रूपांतर होतं आणि धुक्यांची निर्मिती होते. नंतर तापमान, वाऱ्याची दिशा आणि हवेच्या हालचाली बदलल्या की हे धुकं दरीच्या उतारांवरून सरकत वर जाताना दिसतं. त्यामुळं पर्यटकांना दरीतून पांढऱ्या धुक्याची लाट वर येते, असा अविस्मरणीय भास होतो,

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande