
चेन्नई,12 ऑगस्ट (हिं.स.) : कोलकाताहून चेन्नईकडे येणाऱ्या इंडिगोच्या विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मंगळवारी (11 ऑगस्ट) रात्री चेन्नई विमानतळावर पूर्ण आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली. विमानाचे सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले असून विमानातील सर्व 224 प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.
एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिगोचे 6-ई-723 हे विमान कोलकाताहून चेन्नईला येत होते. विमानात एकूण 224 जण होते. विमान रात्री 11.30 वाजता चेन्नई विमानतळावर पोहोचणे अपेक्षित होते. लँडिंगपूर्वी विमान उतरण्याची तयारी करत असताना पायलटला डाव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पायलटने तातडीने एअर ट्रॅफिक कंट्रोलला याबाबत माहिती दिली. विमानाच्या सुरक्षित लँडिंगसाठी विमानतळ प्रशासनाने आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सक्रिय केली आणि पूर्ण आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली.इंडिगोचे विमान रात्री 11.37 वाजता रनवे 25 वर सुरक्षितपणे उतरले. विमानातील सर्व 224 जण सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर रात्री 11.47 वाजता पूर्ण आपत्कालीन स्थिती मागे घेण्यात आली.या घटनेनंतर चेन्नई विमानतळावरील विमान वाहतूक आणि इतर कामकाज सुरळीतपणे सुरू राहिले, अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली.-------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी