




मृतांच्या वारसांना ४ लाख, जखमींना उपचारासाठी ५० हजारांची मदत जाहीर
मुंबई , 12 ऑगस्ट (हिं.स.)। कुर्ला पश्चिमेकडील अशोक नगर, टेकडी क्रमांक ३ परिसरात बुधवारी पहाटे भूस्खलनाची दुर्घटना घडली. डोंगरउतारावरील माती आणि ढिगाऱ्याचा काही भाग जवळील चाळीतील दोन ते तीन खोल्यांवर कोसळल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली. दुर्घटनेची माहिती पहाटे ३ वाजून ४८ मिनिटांनी मिळाल्यानंतर मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), मुंबई पोलीस आणि १०८ रुग्णवाहिका यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकांकडून ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्घटनेत जवळपास सहा ते आठ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत साहिल अन्सारी (२८) आणि मोहम्मद समीर अन्सारी (१४) यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर सोहेल अन्सारी (१८) आणि मोहम्मद अन्सारी (१४) हे दोघे जखमी असून त्यांच्यावर कुर्ला भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
घटनास्थळी जाणारा मार्ग अत्यंत अरुंद असून एकावेळी केवळ एका व्यक्तीस तेथून जाता येते. त्यामुळे बचावकार्य करताना पथकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घटनास्थळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सुमारे ५० कामगार तसेच एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मुंबई अग्निशमन दलानेही मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि बचाव साहित्य घटनास्थळी पाठविले आहे.
दुर्घटनेनंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली. त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले तसेच संबंधित सर्व यंत्रणांना वेगाने आणि समन्वयाने बचावकार्य करण्याचे निर्देश दिले. यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष विजयेंद्र शिंदे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, एल विभागाचे सहायक आयुक्त (प्रभारी) अनिल जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वारसाला चार लाख रुपये आणि जखमींना वैद्यकीय उपचारासाठी ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा महापौरांनी केली आहे. दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या धोकादायक ठिकाणी नागरिकांनी वास्तव्य करू नये, सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, याबाबत महापालिकेकडून वेळोवेळी सूचना दिल्या जातात. टेकडी क्रमांक ३, अशोक नगर येथेही स्थानिक नागरिकांना यापूर्वी सूचना देऊन जनजागृती करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule