
पुणे, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। आजच्या गुंतागुंतीच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पारंपरिक शैक्षणिक शाखांच्या सीमा ओलांडून बहुविषयक शिक्षण आत्मसात करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत कौशल्ये, नवोन्मेष, चिकित्सक विचार आणि नैतिक मूल्ये आत्मसात करून भविष्यातील आव्हानांसाठी स्वतःला सक्षम करावे, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठात आयोजित ११व्या विद्यारंभ समारंभात ते बोलत होते.
यावेळी एमआयटी समूह संस्थांचे संस्थापक व कुलपती डॉ. विश्वनाथ डी. कराड, महाराष्ट्राचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक जे. डी. लक्ष्मीनारायण, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, उषा कराड, कुलगुरू प्रा. राजेश एस., कार्यकारी संचालक डॉ. सुनीता कराड आदी उपस्थित होते.
‘विकसित भारत २०४७’चे स्वप्न साकारण्यासाठी विद्यापीठे आणि युवा शक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे राज्यपाल वर्मा यांनी नमूद केले. आज विद्यार्थ्यांना विविध विषय एकत्रितपणे शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. परस्परांशी जोडलेल्या जगात बहुविषयक शिक्षणामुळे गुंतागुंतीच्या प्रश्नांकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहता येते आणि त्यावर आत्मविश्वासाने उपाय शोधता येतात, असे त्यांनी सांगितले.
कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, क्वांटम संगणन, जैवतंत्रज्ञान, प्रगत उत्पादन तंत्रज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. मात्र तंत्रज्ञानासोबत नैतिकता, मूल्ये आणि करुणा नसेल तर हीच तंत्रज्ञाने विनाशकारी ठरू शकतात. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर मानवजातीच्या कल्याणासाठी झाला पाहिजे, इतरांच्या विनाशासाठी नव्हे, असे वर्मा यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु