लातूर : शालेय वेळेत क्लास भरवणाऱ्यांवर कारवाईचा आदेश
लातूर, 12 ऑगस्ट (हिं.स.)। शालेय वेळेत क्लासच्या नावाखाली वर्ग भरवून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे व्यापारीकरण करण्याच्या प्रकाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेला अखेर यश आले आहे. द्रोणा डिफेन्स अकॅडमीच्या संदर्भ
मनसे


लातूर, 12 ऑगस्ट (हिं.स.)। शालेय वेळेत क्लासच्या नावाखाली वर्ग भरवून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे व्यापारीकरण करण्याच्या प्रकाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेला अखेर यश आले आहे. द्रोणा डिफेन्स अकॅडमीच्या संदर्भात मनसे विद्यार्थी सेनेने उपस्थित केलेल्या प्रश्नांची शिक्षण विभागाने दखल घेतली असून, शालेय वेळेत वर्ग भरविल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा आदेश शिक्षणाधिकाऱ्यांकडून काढण्यात आला आहे.

शाळेच्या नियमित वेळेत क्लासच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे वर्ग भरविले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आला होता. याबाबत विद्यार्थी सेनेने शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करत शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात आवाज उठवला.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देत शालेय वेळेत अनधिकृतपणे किंवा नियमबाह्य पद्धतीने वर्ग भरविणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेने केली होती. या मागणीची दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश देत शालेय वेळेत वर्ग भरविल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

या निर्णयामुळे शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने उभारलेल्या लढ्याला मोठे यश मिळाल्याचे मनसेकडून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी कोणत्याही प्रकारचा खेळ सहन केला जाणार नाही. शालेय वेळेत क्लासच्या नावाखाली शाळा चालविण्याचा प्रकार थांबविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यापुढेही आक्रमकपणे लढा देईल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष किरण चव्हाण यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande