मेळघाटातील आश्रमशाळेत ‘मंत्रोपचार’
कायमस्वरूपी उपाययोजनांकडे अक्षम्य दुर्लक्ष अमरावती, 12 ऑगस्ट (हिं.स.) : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने आश्रमशाळांतील सुरक्षाव्यवस्था ऐरणीवर आली आहे. मेळघाटातसुद्धा अशा घटना घडल्या आहेत. अस्
मेळघाटातील आश्रमशाळेत ‘मंत्रोपचार’


कायमस्वरूपी उपाययोजनांकडे अक्षम्य दुर्लक्ष

अमरावती, 12 ऑगस्ट (हिं.स.) : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने आश्रमशाळांतील सुरक्षाव्यवस्था ऐरणीवर आली आहे. मेळघाटातसुद्धा अशा घटना घडल्या आहेत. अस्वलाच्या हल्ल्यात दोन विद्यार्थी, एक शिक्षक व एका वनपालाचा झालेला मृत्यू, पाण्याची टाकी पडून विद्यार्थिनीचा झालेला मृत्यू, विषबाधेने आजारी पडलेले विद्यार्थी, विचित्र आजाराने त्रस्त विद्यार्थी, अशा गंभीर घटना मेळघाटातील आश्रमशाळांत घडल्या असतानाही ठोस उपाययोजना होत नसल्याची स्थिती आहे. तात्पुरती मलमपट्टी करण्यात येत असली तरी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत नसल्याने प्रश्नांची मालिका कायम आहे.

मेळघाटातील डोमा येथील आश्रमशाळेत एका विद्यार्थिनीच्या प्रकृतीशी संबंधित प्रकारावर वैद्यकीय तपासणी करण्याऐवजी भूमकाकडून कथितरीत्या पूजा-मंत्रोपचार करण्यात आल्याचा प्रकार आता समोर आला आहे. या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीला अचानक त्रास जाणवू लागला. प्रकृती अस्वस्थ झाल्यानंतर तिला वैद्यकीय उपचारासाठी नेण्याऐवजी कथितरीत्या भूमकाकडे नेण्यात आले. तेथे विद्यार्थिनीवर पूजा-मंत्रोपचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थिनीच्या प्रकृतीमागील नेमके कारण शोधण्यासाठी डॉक्टरांकडून तपासणी व आवश्यक वैद्यकीय उपचार होणे अपेक्षित असताना अशाप्रकारचा मार्ग अवलंबल्याने चिंता व्यक्त होत आहे. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या आरोग्याची जबाबदारीही संबंधित प्रशासनाची आहे. आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आजारपण किंवा आरोग्यविषयक त्रास उद्भवल्यास तातडीने आरोग्ययंत्रणेशी संपर्क साधणे आवश्यक आहे. मात्र, या घटनेत वैज्ञानिक उपचारांऐवजी भूमकाचा आधार घेतल्याचे समोर आल्याने आश्रमशाळेतील संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, विद्यार्थिनीच्या प्रकृतीचे नेमके कारण काय होते, तिला कोणता त्रास झाला होता, तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली का? आणि संबंधित प्रकाराबाबत शाळा प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली का?, याबाबत स्पष्टता झालेली नाही.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ नको

आश्रमशाळांमध्ये ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांना वेळेवर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, आवश्यक औषधोपचार करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे. डोमा आश्रमशाळेतील याप्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

काही अनुदानित आश्रमशाळांची परिस्थिती गंभीर

अमरावती जिल्ह्यात आदिवासी क्षेत्र व आदिवासी क्षेत्राबाहेर एकूण ४७ आश्रमशाळांमध्ये जवळपास २२ हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्ह्यात काही अनुदानित व शासकीय आश्रमशाळांची स्थिती गंभीर आहे. दोन वर्षांपासून शासकीय आश्रमशाळांच्या रचनेमध्ये बदल दिसत आहेत. नव्याने बांधकाम सुरू झाल्याने बऱ्यापैकी इमारतीची परिस्थिती व येथील व्यवस्थेत बदल दिसून येतो. चिखलदरा तालुक्यात सहा, तर धारणी तालुक्यात आठ शासकीय आश्रमशाळा आहेत. उर्वरित शासकीय आश्रमशाळा या परतवाडा, अंजनगावसुर्जी, वरुड व इतर ठिकाणी आदिवासी क्षेत्राबाहेर आहेत. त्यापैकी आठ ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालयांनाही जोडण्यात आले आहे. याव्यतिरिक्त मेळघाटमधील चिखलदरा व धारणी, या दोन तालुक्यांत अनुदानित आश्रमशाळांची संख्या २७ च्या घरात आहे. काही अनुदानित आश्रमशाळा या आदिवासी क्षेत्राबाहेरही आहेत. जिल्ह्यातील २० शासकीय आश्रमशाळांमध्ये सुमारे १२ हजार मुले-मुली प्रवेशित असून, २७ अनुदानित आश्रमशाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या ११ हजार ५०० च्या घरात आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande