चिखलदऱ्यात कोट्यवधींचं सुसज्ज बसस्थानक कुलूपबंद
अमरावती, 12 ऑगस्ट (हिं.स.) | विदर्भाचे नंदनवन, थंड हवेचं ठिकाण आणि लाखो पर्यटकांचं आकर्षण असलेल्या चिखलदऱ्याला जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अमरावती शहरातून थेट एसटी बससेवा नसल्याची विसंगत परिस्थिती आहे. अमरावती जिल्ह्यातील अकरा तालुक्यांपैकी चिखलदर
चिखलदऱ्यात कोट्यवधींचं सुसज्ज बसस्थानक कुलूपबंद;


अमरावती, 12 ऑगस्ट (हिं.स.) | विदर्भाचे नंदनवन, थंड हवेचं ठिकाण आणि लाखो पर्यटकांचं आकर्षण असलेल्या चिखलदऱ्याला जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अमरावती शहरातून थेट एसटी बससेवा नसल्याची विसंगत परिस्थिती आहे. अमरावती जिल्ह्यातील अकरा तालुक्यांपैकी चिखलदरा वगळता इतर तालुक्यांशी अमरावतीची एसटी सेवा उपलब्ध आहे. परंतु, चिखलदरासाठी अमरावती मध्यवर्ती आगारातून नियमित बस फेरी नाही.विशेष म्हणजे चिखलदऱ्यात प्रवाशांसाठी सुसज्ज बस स्थानक उभारण्यात आलंय. तरीही या बस स्थानकातून अमरावतीकडं जाणाऱ्या बसचा अभाव असल्यामुळं प्रवाशांसह पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

चिखलदरा इथं राज्य परिवहन महामंडळांना अत्यंत सुसज्ज बस स्थानकाची इमारत उभारली आहे. कार्यालय, चौकशी कक्ष, चालक वाहक विश्रांतीगृह, हिरकणी कक्ष यासारख्या सुविधा इथं उपलब्ध केल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात या सुविधांचा वापर कितपत होतो? हा प्रश्नच आहे. बस स्थानकाचा कारभार परतवाडा आगारातून चालत असल्यामुळं चिखलदऱ्यात उभारलेल्या या इमारती अनेक सुविधा कुलूप बंद अवस्थेत आहेत. एकीकडं लाखो रुपये खर्च करून उभारलेली पायाभूत सुविधा आणि दुसरीकडं तिचा पुरेसा वापर नसल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळं एसटी महामंडळाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

चिखलदरा बस स्थानकावर आवडेल तिथं प्रवास योजनेसह विविध पाच योजना आणि प्रवासी सवलतींचे फलक लावले आहेत. महाराष्ट्र तसंच आंतरराज्य प्रवासासाठी सात दिवसांच्या पाचपासून मासिक पास आणि त्रैमासिक पासपर्यंतच्या योजनांची माहिती या फलकावर दिली आहे. प्रौढ आणि लहान मुलांसाठी साध्या तसंच शिवशाही बसच्या पासचे दर विविध कालावधीच्या पाच योजना यांची माहिती प्रवाशांसाठी दिली आहे. मात्र, या सर्व योजनांची माहिती देणाऱ्या बस स्थानकातून जिल्ह्याचे प्रमुख केंद्र असलेल्या अमरावतीसाठी नियमित बस सेवा नसणं ही या व्यवस्थेतील सर्वात मोठी विसंगती ठरत आहे.

एसटी महामंडळाच्या वतीनं विविध सामाजिक घटकांना देण्यात येणाऱ्या प्रवासी भाड्यातील सवलतीचा मोठा तक्ताही बस स्थानकावर लावला आहे. या तक्त्यात तब्बल 43 प्रकारच्या सवलतींचा उल्लेख आहे. त्यापैकी 18 सवलती 100 टक्के असल्याचं नमूद आहे. इतर सवलती 70, 50, 45 आणि 30 टक्के अशा विविध प्रमाणात असल्याचं फलकावर दर्शवलं आहे. प्रवाशांच्या हितासाठी सवलतीची एवढी मोठी व्यवस्था दाखवली जात आहे. यावेळी प्रवाशांना त्यांच्या गरजेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पुरेशी बस सेवा मात्र उपलब्ध नसल्यामुळं या फलकांचं औचित्य काय? असा अहवाल उपस्थित होत आहे.

परतवाडा, धारणी आणि यवतमाळचीच जोडणी

चिखलदरा बस स्थानकावरून परतवाडा, धारणी आणि अमरावती वरून चिखलदरा या दिशांना बस सेवा उपलब्ध आहे. यवतमाळसाठी सकाळी सहा वाजता बस सुटते. तर धारणीसाठी सकाळी 11 वाजता बस जाते. यवतमाळहून रात्री साडेआठच्या सुमारास चिखलदराला येणारी बस इथं मुक्कामी असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, या बसची वेळ योग्य नाही. परतवाडा आणि धारणी मार्गानं येणाऱ्या काही गाड्यांचाही चिखलदऱ्यात मुक्काम असल्याचं बस स्थानकावरील माहितीत नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात उपलब्ध असलेल्या फेऱ्यांची संख्या यापेक्षा कमी असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande