मुंबई : विले पार्लेतील 12 मजली इमारतीला भीषण आग; चिमुकल्यासह तरूणीचा मृत्यू
मुंबई, 12 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबईतील विले पार्ले परिसरातील शांता भवन या 12 मजली निवासी इमारतीच्या 11 व्या मजल्यावर मंगळवारी रात्री भीषण आग लागून अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह एका 23 वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले असून, त्यामध
Mumbai Massive fire 12-storey Vile Parle building two death


मुंबई, 12 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबईतील विले पार्ले परिसरातील शांता भवन या 12 मजली निवासी इमारतीच्या 11 व्या मजल्यावर मंगळवारी रात्री भीषण आग लागून अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह एका 23 वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले असून, त्यामध्ये दोन अग्निशमन दलाच्या जवानांचाही समावेश आहे. मंगळवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या 11 व्या मजल्यावरील दोन फ्लॅटमध्ये अचानक आग लागली. आगीने काही वेळातच दोन्ही घरांमधील मोठ्या परिसराला वेढा दिला.

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही फ्लॅटमध्ये सुमारे 4 हजार चौरस फूट परिसरातील विद्युत वायरिंग, विद्युत उपकरणे, एसी युनिट तसेच विविध घरगुती वस्तू जळून खाक झाल्या. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता लक्षात घेऊन बचावकार्य सुरू करण्यात आले. जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर बुधवारी पहाटे सुमारे 1 वाजेपर्यंत आग पूर्णपणे नियंत्रणात आणली.

या दुर्घटनेत अबीर नावाच्या अडीच वर्षांच्या मुलाला आणि अंकिता (23) या तरूणीला गंभीर दुखापत झाली. दोघांनाही उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आगीत अन्य चार नागरिकही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दोघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, उर्वरित दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

बचावकार्यादरम्यान दोन अग्निशमन दलाचे जवानही जखमी झाले. मनोज सोनावणे (30) आणि शिवम द्विवेदी (29) यांना उपचारासाठी जवळच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर दोघांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, विद्युत बिघाडामुळे आग लागली का, यासह अन्य शक्यतांचा तपास करण्यात येत आहे. आगीच्या कारणाचा शोध घेण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande