रायगडमध्ये खरीप पीकस्पर्धेसाठी शेतकऱ्यांना आवाहन
आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन आगामी ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत रायगड, १२ ऑगस्ट (हिं.स.)। शेतकऱ्यांमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादकता वाढीसाठी प्रयोगशीलता आणि स्पर्धात्मक वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी व
Online applications for Kharif crop competition; deadline is August 31.


आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन

आगामी ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत

रायगड, १२ ऑगस्ट (हिं.स.)। शेतकऱ्यांमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादकता वाढीसाठी प्रयोगशीलता आणि स्पर्धात्मक वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागातर्फे खरीप हंगाम २०२६-२७ अंतर्गत राज्यस्तरीय पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या ११ पिकांसाठी स्पर्धा घेण्यात येणार आहे. तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर विजेत्यांची निवड केली जाणार असून, सर्वसाधारण तसेच आदिवासी गटासाठी स्वतंत्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करणे तसेच त्यांच्या अनुभवांचा इतर शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. यंदापासून स्पर्धेची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असून, त्यामुळे अर्जप्रक्रियेत पारदर्शकता आणि गतिमानता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

भातासाठी २०, तर इतर पिकांसाठी ४० गुंठे क्षेत्र आवश्यक

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर जमीन असणे आणि त्याने स्वतः त्या जमिनीवर लागवड केलेली असणे आवश्यक आहे. भातासाठी किमान २० गुंठे, तर इतर पिकांसाठी किमान ४० गुंठे सलग लागवड क्षेत्र असणे बंधनकारक आहे. एका शेतकऱ्याला एकापेक्षा अधिक पिकांसाठीही स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ आहे. सर्वसाधारण गटासाठी प्रवेश शुल्क ३०० रुपये, तर आदिवासी गटासाठी १५० रुपये आहे.

राज्यस्तरावर ५० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक

तालुका स्तरावर प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रुपये, जिल्हा स्तरावर १० हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपये, तर राज्य स्तरावर अनुक्रमे ५० हजार, ४० हजार आणि ३० हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘पीक स्पर्धा नोंदणी’ या टॅबद्वारे ऑनलाइन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande