
छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांना पशुसंवर्धन क्षेत्रातील विविध बाबींचे शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळावे आणि त्यातून त्यांना पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी उपलब्ध व्हावी,यासाठी पशुसंवर्धन विभाग योजना राबवित आहे.जिल्हा परिषद धाराशिवच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना पशुसंवर्धनविषयक प्रशिक्षण देण्याच्या योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
या योजनेसाठी ९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अर्ज करता येणार आहेत.१० सप्टेंबर २०२६ नंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत,त्यामुळे इच्छुक लाभार्थ्यांनी निर्धारित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
योजनेसाठी अर्जाचा विहित नमुना, मार्गदर्शक सूचना,नियम व अटी तसेच अर्जासोबत जोडावयाच्या आवश्यक कागदपत्रांची यादी पशुसंवर्धन विभाग,पंचायत समिती येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.इच्छुक लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी आपल्या कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय दवाखाने तसेच पशुधन विकास अधिकारी (विस्तार),पंचायत समिती येथे संपर्क साधावा.तसेच एनआयसीच्या Dharashiv.nic.in या संकेतस्थळावरही अर्जाचे नमुने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी योजनेची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत अर्ज करावा.
अनुसूचित जातीतील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा उपआयुक्त,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय,जिल्हा परिषद, धाराशिव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis