अमरावती मनपा वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण व चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती, 12 ऑगस्ट, (हिं.स. ) अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत अमरावती महानगरपालिका प्राथमिक हिंदी शाळा क्र. १२, मनपा हिंदी कन्या माध्यमिक विद्य
अमरावती मनपा वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण व चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद


अमरावती, 12 ऑगस्ट, (हिं.स. ) अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत अमरावती महानगरपालिका प्राथमिक हिंदी शाळा क्र. १२, मनपा हिंदी कन्या माध्यमिक विद्यालय, आय एम एस उर्दू उच्च प्राथमिक शाळा नागपुरी गेट आणि अमरावती महानगरपालिका उर्दू शाळा क्र.२, अलीम नगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह शिक्षक, मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रध्वजाविषयी अभिमान तसेच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून तिरंगा, राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्य, पर्यावरण संवर्धन आदी विषयांवर विविध रंगांच्या माध्यमातून चित्रे साकारली.

या कार्यक्रमात महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, गटनेते शेख हमीद शेख वाहेद, झोन सभापती खॉ आसिया अंजुम वहिद, नगरसेविका शाह बीबी बतुल ताहेर, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, शहर अभियंता श्रीधर कांबळे, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम आणि सहाय्यक आयुक्त मनोज शहाळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मान्यवरांनी शाळेच्या परिसरात विविध प्रकारची रोपे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. राष्ट्रध्वज हा देशाच्या स्वातंत्र्याचे, एकतेचे आणि अखंडतेचे प्रतीक असून त्याचा सन्मान राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

चित्रकला स्पर्धेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विषयांवर आकर्षक चित्रे काढून आपल्या भावना व्यक्त केल्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. शालेय स्तरावर अशा उपक्रमांचे आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलात्मक कौशल्याला वाव मिळण्याबरोबरच त्यांच्यामध्ये सामाजिक व राष्ट्रीय बांधिलकीची भावना अधिक दृढ होत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश

वृक्षारोपण कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. लावण्यात आलेल्या वृक्षांची नियमित देखभाल करण्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले.

अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून ‘देशप्रेमासोबतच पर्यावरण संवर्धन’ हा दुहेरी संदेश देण्यात आला. वृक्षारोपण, चित्रकला स्पर्धा आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहता मनपा शाळांमध्ये अशा सामाजिक व राष्ट्रीय उपक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमास ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक राजेश राठोड, मनपा अधिकारी व कर्मचारी, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande