
पुणे, 12 ऑगस्ट (हिं.स.)।
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) क्षेत्रातील मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाला गेल्या काही दिवसांपासून अपेक्षित गती मिळालेली नाही. आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी व्यवस्थापक सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सल्लागार नियुक्तीनंतर प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.इंद्रायणी, पवना आणि मुळा-मुठा नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना सुरू असताना पीएमआरडीएनेही आपल्या हद्दीतील नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नदी प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
प्रकल्पांतर्गत आवश्यक त्या ठिकाणी मलनिस्सारण केंद्रे (एसटीपी) उभारण्यात येणार आहेत. पीएमआरडीए क्षेत्रातील अनेक ठिकाणी दूषित सांडपाणी नाल्यांमार्फत थेट नदीत मिसळत आहे. त्यामुळे हे पाणी नदीत जाण्यापूर्वी एकत्रितपणे संकलित करण्यासाठी मलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत.याशिवाय नदीपात्रातील जलपर्णी निर्मूलन, घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या उपाययोजनांचाही प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नदी प्रदूषणाचे विविध स्रोत रोखण्याबरोबरच नदीपात्राची स्वच्छता आणि पर्यावरणीय स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु