लातूर जिल्ह्यातील तब्बल २२ हजार ९६३ शेतकऱ्यांना १५९ कोटींचा निधी प्राप्त
लातूर, 12 ऑगस्ट, (हिं.स.) - राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील २२ हजार ९६३ पात्र शेतकऱ्यांसाठी तब्बल १५९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये लातूर जिल्हा मध्
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना


लातूर, 12 ऑगस्ट, (हिं.स.) - राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील २२ हजार ९६३ पात्र शेतकऱ्यांसाठी तब्बल १५९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १८ हजार ५८० शेतकऱ्यांसाठी १२२ कोटी ७१ लाख ५५ हजार ४९ रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. उर्वरित प्राप्त रक्कम ही राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांमधील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर जमा करण्यात आली असून, अद्याप रक्कम न मिळालेल्या उर्वरित पात्र लाभार्थ्यांचा निधी लवकरच प्राप्त होणार आहे. तो निधी मिळताच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व्ही. एल. पोतंगले यांनी दिली.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ज्या शेतकऱ्यांची कर्जे पूर्णपणे माफ होऊन खाती बेबाकी झाली आहेत, अशा शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यांना लवकरच आगामी हंगामासाठी नवीन पीक कर्ज वाटपाचा लाभ दिला जाणार आहे. शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या यादीत लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांतील एकूण ८९४ गावांमधील ५४ हजार ३८८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ३५ हजार ३९७ आणि राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांचे १८ हजार ९९१ शेतकरी सभासदांचा त्यांच्या विशिष्ट क्रमांकासह या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. यापैकी जिल्ह्यातील ४० हजार ९ (७३.५६ टक्के) पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. अद्याप १४ हजार ३७९ पात्र लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित आहे.

आधार प्रमाणीकरणानंतरच कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची नावे पात्र शेतकऱ्यांच्या यादीत समाविष्ट आहेत, त्यांनी विनाविलंब जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपली ॲग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री. पोतंगले यांनी केले आहे. आधार प्रमाणीकरणासाठी आधार कार्ड, कर्ज खात्याचे व बचत खात्याचे पासबुक, प्रद्ध यादीत नावापुढे नमूद असलेला विशिष्ट क्रमांक आवश्यक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande