
सोलापूर, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते सचिन (दादा) कल्याणशेट्टी यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार कल्याणशेट्टी यांच्या सुरक्षेत तातडीने वाढ करावी तसेच संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी केली आहे.
यासंदर्भात वाघमारे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते आणि नागरिक विविध कामांसाठी येत असतात. तसेच विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांना सातत्याने प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या जीवाला कथित धोका लक्षात घेता सुरक्षेचा मुद्दा गंभीर असल्याचे वाघमारे यांनी पत्रात नमूद केले आहे.
आमदार कल्याणशेट्टी यांना कथित हत्येची धमकी देण्यामागे एखादी शक्ती कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा वाघमारे यांनी केला. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सखोल तपास करावा आणि आमदारांच्या सुरक्षेत तातडीने वाढ करावी, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणातील आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड