
सोलापूर, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। युवकांमधील सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि समाजोपयोगी कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणारा सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा युवा पुरस्कार व युवा महोत्सव समितीच्या बैठकीत सविस्तर छाननी, गुणांकन आणि चर्चेनंतर युवक, युवती आणि संस्था या तीन प्रवर्गांतील पुरस्कारार्थींची सर्वानुमते निवड करण्यात आली.
युवक प्रवर्गात पंढरपूर येथील मुजम्मील खलील कमलीवाले यांची निवड झाली आहे. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण आणि मानवतावादी क्षेत्रात सातत्याने कार्य केले आहे. गरजू आणि वंचित घटकांसाठी आरोग्य शिबिरे, रक्तदान जनजागृती, औषधे व जीवनावश्यक साहित्याचे वितरण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण तसेच स्वच्छता अभियान यांसारखे विविध उपक्रम त्यांनी राबविले आहेत.युवकांना सामाजिक कार्याशीजोडण्यासोबतच सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांनी केलेल्या बहुआयामी कार्याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.युवती प्रवर्गात कुरुल, ता. मोहोळ येथील डॉ. चंदाराणी अशोक क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे. वैद्यकीय व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण आणि गरजू नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे.आषाढी यात्रेच्या कालावधीत वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि औषध वितरणासह विविध आरोग्यविषयक उपक्रम त्यांनी राबविले. आरोग्य सेवा, जनजागृती, समाजसेवा आणि राष्ट्र उभारणीतील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड