सोलापूर महापालिका नागरिकांना वेळेत सेवा देण्यात आघाडीवर; राज्य आयुक्तांकडून अभिनंदन
सोलापूर, 12 ऑगस्ट, (हिं.स.) - महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सोलापूर महानगरपालिकेस भेट देऊन लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध नागरी सेवांचा आढावा घेतला. यावेळी महापालिकेच्या ड
gfd


सोलापूर, 12 ऑगस्ट, (हिं.स.) - महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सोलापूर महानगरपालिकेस भेट देऊन लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध नागरी सेवांचा आढावा घेतला. यावेळी महापालिकेच्या डिजिटल सेवा प्रणालीचे तसेच नागरिकांचे अर्ज वेळेत निकाली काढण्याच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले.

सोलापूर महानगरपालिकेमार्फत नागरिकांना सध्या १४८ नागरी सेवा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नागरिकांना पारदर्शक, सुलभ आणि विहित कालमर्यादेत सेवा मिळावी, यासाठी महापालिकेने विकसित केलेल्या संगणकीकृत प्रणालीची माहिती यावेळी देण्यात आली. महापालिकेकडे प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या अर्जांपैकी सुमारे ९८ टक्के अर्ज विहित कालमर्यादेत निकाली काढले जात असल्याचे यावेळी निदर्शनास आले. नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही कामगिरी उल्लेखनीय असल्याचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी नमूद केले.

महापालिकेने विकसित केलेली ऑनलाइन संगणक प्रणाली सर्वोत्कृष्ट आणि प्रभावी असल्याचे गौरवोद्गार तेलंग यांनी काढले. या प्रणालीचा इतर महानगरपालिकांमध्येही अवलंब किंवा विस्तार केल्यास नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेत लोकसेवा उपलब्ध करून देता येईल, असे त्यांनी सांगितले.

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत तेलंग यांनी महापालिका आयुक्तांसह संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. नागरिककेंद्रित प्रशासन, डिजिटल सेवा आणि पारदर्शक कार्यपद्धतीच्या माध्यमातून सोलापूर महापालिकेने केलेली कामगिरी इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मार्गदर्शक ठरू शकते, असेही राज्य आयुक्तांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande